scorecardresearch

खलिस्तानवाद्यांची धरपकड, अमृतपालच्या ठावठिकाण्याबाबत गूढ; ७८ समर्थक ताब्यात

खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी शनिवारी नाटय़पूर्णरित्या ताब्यात घेतले.

adv khalistan fight
खलिस्तानवादी अमृतपाल ताब्यात (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पीटीआय, चंडीगड : खलिस्तानवादी स्वयंघोषित शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी शनिवारी नाटय़पूर्णरित्या ताब्यात घेतले. त्याच्यावर कारवाई करण्याआधी त्याच्या दहा निकटवर्तीय समर्थकांना ताब्यात घेण्यात आले होते. अमृतपाल सिंग याला नकोदरनजीक ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे पसरणाऱ्या संभाव्य अफवांना आळा घालण्यासाठी राज्यभरातील इंटरनेट आणि एसएमएस सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत.

‘काही लोक’ हिंसाचाराला चिथावणी देण्याची भीती असल्यामुळे इंटरनेट सेवा रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती गृहखात्यातर्फे देण्यात आली. पोलिसांनी शनिवारी जालंधर जिल्ह्यातील मेहतपूर खेडय़ात अमृतपाल सिंगचा ताफा अडवला होता. त्याचे मूळ गाव असलेल्या अमृतसरमधील जल्लुपूर खेडा गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आपला पाठलाग करत असल्याचा दावा करणाऱ्या काही चित्रफिती ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल याच्या काही समर्थकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या होत्या. अमृतपाल एका वाहनात बसला असून, त्याचे काही समर्थक ‘‘पोलीस ‘भाईसाब’च्या मागावर आहेत,’’ असे म्हणत असल्याचेही एका चित्रफितीत दिसत होते. दरम्यान, पंजाब पोलिसांनी नागरिकांनी शांतता आणि ऐक्य कायम राखण्याचे आवाहन केले आहे. पंजाब पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच खोटय़ा बातम्या किंवा द्वेषपूर्ण भाषणे पसरवू नयेत, असे आवाहन करणारा ट्वीटसंदेश पोलिसांनी प्रसारित केला आहे. 

गेल्या महिन्यात अमृतपाल आणि त्याच्या काही बंदुकधारी समर्थकांनी अडथळे मोडून, अमृतसर शहराच्या वेशीवर असलेल्या अजनाला पोलीस ठाण्यात घुसखोरी केली होती. अमृतपालच्या एका साथीदाराची सुटका करावी या मागणीसाठी त्यांनी पोलिसांशी संघर्ष केला होता. या घटनेत पोलीस अधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्यासह सहा पोलीस जखमी झाले होते.

काय घडले ?

  • भिंद्रनवाले २.० अशी ओळख असलेला अमृतपाल शनिवारी दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार होता. त्यातील एक जालंदरमधील शाहकोट येथे आणि दुसरा मोगा येथे होता.
  • पोलिसांनी शाहकोटजवळ अमृतपालची मोटार अडवली आणि त्याच्या अटकेची उच्चस्तरीय कारवाई सुरू केली.
  • मात्र, अमृतपाल नेमका कोठे आहे? त्याला अटक केली आहे का? याबाबत कोणतीही माहिती पोलीस देत नव्हते.

‘आयएसआय’शी संबंध?

पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडल्यापासून फरार झालेल्या अमृतपालचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि परदेशातील काही दहशतवादी गटांशी संबंध आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी शनिवारी दिली. अमृतपालने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक गुप्त धमकीही दिली होती. तो शीख तरुणांना त्यांच्या ‘वारीस पंजाब दे’ या संघटनेकडे आकर्षित करून पंजाबमधील परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 00:03 IST