राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली आहे. मोदींनी यासंदर्भातील दोन ट्विट केले असून हे नाव बदलण्यामागील कारणाचाही खुलासा त्यांनी केलीय.

खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं मोदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. “मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुर्सकारांचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींनी, “मेजर ध्यानचंद हे भारतातील आघाडीचे खेळाडू होते. त्यांनी देशाला भरपूर मान मिळवून दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांचं नाव देणं योग्य ठरेल,” असं म्हणालेत.

खेलरत्न पुरस्कार काय आहे?

१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम, क्रिकेट रोहीत शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येतं.