पुण्याच्या खोडद येथे असणाऱ्या महाकाय दुर्बिणीने अर्थात ‘जीएमआरटी’ने (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) ऐतिहासिक यश संपादन केले आहे. युरोपियन अंतराळ संस्थेने (ईएसए) मंगळावर रेडिओ सिग्नलद्वारे पाठवलेला संदेश ‘जीएमआरटी’ने टिपला आहे. या रेडिओ सिग्नल्सची क्षमता अत्यंत क्षीण असल्याने हे सिग्नल्स टिपणे खूप अवघड असते. मात्र, ‘जीएमआरटी’ने ही कामगिरी करून स्वत:च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘ईएसए’च्या मंगळयान  मोहीमेसाठी खोडद ‘जीएमआरटी’ची पृथ्वीवरील निरीक्षण केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. मंगळ ग्रहाबाबतच्या नव्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी जीएमआरटीची मदत घेतली जात होती. पुण्यातील नारायणगावजवळ खोडद येथे ही जीएमआरटी आहे. ‘ईएसए’चे यान आज मंगळाभोवती कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. या यानाने छोटा रोव्हर मंगळावर उतरवण्याचा प्रयत्न केला.  या महत्त्वाच्या टप्प्यावर रोव्हरचा पृथ्वीशी संपर्काचा मार्ग म्हणून ‘जीएमआरटी’ची भूमिका महत्त्वाची ठरली. रोव्हर मंगळावर उतरताना त्याने पाठवलेला पहिला रेडिओ संदेश ‘जीएमआरटी’नेच टिपला. या सिग्नलची क्षमता ४०१ मेगाहार्टझ इतकी होती. जीएमआरटी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणींपैकी एक आहे. नासा, इस्रो यांसारख्या मोठ्या अंतराळ संशोधन संस्थांनी याआधीही अनेकदा या दुर्बिणीची मदत घेतली होती. यापूर्वीही जीएमआरटीने पल्सारची निर्मिती होताना ती प्रत्यक्ष टिपण्याची अतिशय दुर्मीळ कामगिरी करून दाखविली होती. जगात यापूर्वी केवळ दोन वेळा अशी घटना टिपण्यात यश आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khodad radio telescope gmrt catches signals from europe mission to mars
First published on: 20-10-2016 at 07:37 IST