Kidnapping Laborers From Jharkhand : झारखंडमधील पाच कामगारांचं दक्षिण आफ्रिकेतील नायजरमध्ये गुन्हेगारांनी अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बंदुकीचा धाक दाखवून पाच कामगारांचं अपहरण करण्यात आलं आहे. हे सर्वजण १५ महिन्यांपासून एका कंपनीत काम करत होते. मात्र, या पाच जणांचं अपहरण झाल्यापासून त्यांच्या कुटुंबातील सदस्य असह्य झाले असून सरकारकडे मदतीची याचना करत आहेत.

झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातील हे सर्व स्थलांतरित कामगार आहेत. ते एका वीज पारेषण आणि वितरण कंपनीत काम करत होते. दरम्यान, या घटनेबाबत बोलताना ३५ वर्षीय स्थलांतरित कामगार मोजिलाल महतोने सांगितलं की, लोक जेवण संपवून कामावर परतण्याच्या बेतात होते. पण तेव्हाढ्यात गोळीबाराचा आवाज आला. २५ एप्रिल रोजी पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशातील तिलाबेरी प्रदेशात बंदूकधाऱ्यांनी त्यांचा मेहुणा संजय महतो आणि इतर चार जणांचं अपहरण केलं.”

अपहरण केलेल्या कामगारांमध्ये चंद्रिका महतो, संजय महतो, राजू महतो, फलजीत महतो, उत्तम महतो यांचा समावेश आहे. अपहरण झालेल्यांमध्ये नायजरचा देखील एक नागरिक आहे. दरम्यान, “आम्ही कंपनीच्या बसमध्ये आश्रय घेतला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ती गाडी वाळूमध्ये अडकली. सुमारे ७०-८० मोटारसायकली आमच्या मागे येत होत्या. त्या सर्व बंदुका घेऊन होत्या”, असं मोजिलाल महतोने सांगितलं. या संदर्भातील वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

मोजिलालने पुढे सांगितलं की, “तब्बल दीड तास गोळीबार सुरू होता. आम्ही एका सांडपाण्याच्या पाईपमध्ये घुसून पळून जाण्यात यशस्वी झालो. पण संजय, राजू, फलजीत, चंद्रिका, उत्तम आणि नायजरमधील एका स्थानिकाला अखेर बंदूकधाऱ्यांनी पकडलं. मी शेवटचं पाहिलं तेव्हा फालजीतने हात वर करून आत्मसमर्पण केलं होतं.”

दरम्यान, दोंडलो गावातील संजयच्या घरी त्याची पत्नी सोनी देवी हिला तिच्या दोन्ही मुलांना काय बोलावं हे कळत नाही. माझ्या मुलांनी वडिलांबाबत विचारलं तर मी आमच्या मुलांना काय सांगू? हा प्रश्न तिला पडला आहे. ते लवकरच येईतील हे मुलांना सांगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असंही तिने म्हटलं आहे. तसेच याच गावात राहणाऱ्या राजूच्या कुटुंबालाही पुन्हा त्याच्याशी कधी बोलायला मिळेल का? हा प्रश्न पडला आहे.

“संबंधित कंपनी आणि सरकार या प्रकरणाबाबत शोध मोहीम राबवत असल्याचं आम्हाला कळवण्यात आलं आहे”, असं राजूच्या २२ वर्षीय भावाने सांगितलं आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाला या प्रकरणाबाबत माहिती असून सरकार त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.