भाजपकडून किरण बेदी यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. भाजप आणि ‘आप’मधला संघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे. अरविंद केजरीवाल यांनी किरण बेदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले आणि केजरीवाल यांचे आव्हान बेदी यांनी स्वीकारले देखील. केजरीवालांच्या खुल्या चर्चेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना किरण बेदी यांनी केजरीवालांना केवळ चर्चेत रस आहे पण, माझा काम करण्यावर विश्वास आहे, असा टोला लगावला. तसेच निवडणुकीनंतर सभागृहात खुल्या चर्चेसाठी तयार असल्याचे देखील बेदी यावेळी म्हणाल्या. उमेदवाराने निवडून यावे आणि सभागृहात जनतेच्या समस्यांवर खुली चर्चा करावी या चर्चेसाठी नेहमी तयार असू, असे बेदी यांनी सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी रात्री किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी केजरीवाल यांनी किरण बेदी यांना शुभेच्छा देत निवडणुकीआधी विविध मुद्द्यांवर खुल्या चर्चेसाठी बेदी यांनी तयारी दाखवावी असे आव्हान केले. यावर किरण बेदी यांनी चर्चेस तयार असल्याचे सांगत, ही चर्चा सभागृहात होईल. त्यामुळे उमेदवाराने निवडून यावे आणि सभागृहात चर्चा करावी, असे म्हटले.