भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर कायम सक्रीय असतात आणि इथेच ते आपल्या आंदोलनाबाबत विविध घडामोडींची ताजी माहिती देखील देत असतात. अशाच प्रकारे त्यांना आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट करत, शेतकऱ्यांना संदेश व केंद्र सरकारला सूचक इशारा दिला आहे.

राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, “संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने २२ नोव्हेंबर लखनऊमध्ये किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही महापंचयात ऐतिहासिक असेल आणि शेतकरी विरोधी सरकार आणि तीन काळ्या कायद्याच्या शवपेटीचा शेवटचा खिळा ठरेल. याचबरोर त्यांनी हे देखील सांगितले की, या महापंचायतीनंतर आता पूर्वांचलमध्ये देखील शेतकरी आंदोलन आणखी गतीमान होईल.” असं राकेश टिकैत म्हणाले आहेत.

केंद्र सरकारच्या तीन कृषि कायद्यांच्या विरोधात मागील ११ महिन्यांपासून पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्यासोबत शेतकरी नेत्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही. याच दरम्यान प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जो हिंसाचार घडला, तो सर्वांसाठी धक्कादाक होता.