भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी गुजरातमधून पतंग आकाशात झेपावला. संक्रांतीच्या निमित्ताने गुजरातमध्ये पतंग उत्सवाला विशेष महत्त्व आहे. विविध आकारांचे आणि विविध प्रकारांचे पतंग या उत्सवात आकाशात झेपावतात. या पतंगांमध्ये यावेळी वेगळेपण दिसले ते या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी असलेल्या पतंगामुळे. हार्टशेप फुगे आणि कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करणारा पतंग आकाशात झेपावला. यावर पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाही लिहिण्यात आली होती. तसेच चप्पल चोर पाकिस्तान असे लिहूनही पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

कुलभूषण जाधव हे रॉ चे एजंट असल्याचा ठपका ठेवत पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या फाशीला स्थगिती दिली. डिसेंबर महिन्यातच कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी भेटीसाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यावेळी जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानकडून अत्यंत हीन वागणूक देण्यात आली. कुलभूषण जाधव यांच्या पत्नीची चप्पलही पाकिस्तानने ठेवून घेतली होती. ज्या गोष्टीचा नेटकऱ्यांनीही चांगलाच समाचार घेत पाकिस्तानला ट्विटरवर ट्रोल केले होते. तर मागच्याच आठवड्यात काही अनिवासी भारतीयांनी अमेरिकेतील भारतीय दुतावासासमोर जाऊन पाकिस्तान चप्पलचोर असल्याच्या घोषणा दिल्या होत्या. कुलभूषण जाधव म्हणजे भारतीय दहशतवादाचा चेहेरा आहे असे वक्तव्य जेव्हा पाकिस्तानने केले त्यानंतरही पाकिस्तानवर टीकेची झोड उठली होती. आता संक्रांत उत्सव साजरा करतानाही पाकिस्तानवर पतंगबाजीच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे आहेत. अशात या दोन्ही देशांमधील लोकांच्या भावनाही तितक्याच तीव्र आहेत. मग तो भारत पाकिस्तान क्रिकेट सामना असो किंवा इतर कोणतीही घटना. आता कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीचा निषेध जगभरातल्या भारतीयांनी नोंदवला आहे. ट्विटर, सोशल मीडियाचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे. मात्र संक्रांत साजरी करत पतंगबाजीची मजा लुटत असतानाही या घटनेचा प्रभाव दिसून आला.