Benefits of Ayushman Bharat Scheme: अन्न, वस्त्र, निवारा यांसह आरोग्य व शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. व्यक्तीला चांगले आयुष्य जगता यावे, यासाठी काही गोष्टी अत्यावश्यक असतात. त्याच दृष्टिकोनातून सरकार सामान्यांसाठी काही योजना घोषित करून, त्यांची अंमलबजावणी करते.
सामान्य व्यक्तीला आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणलेल्या आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY), महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जन शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK), राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम अशा काही योजना भारत व महाराष्ट्र सरकारकडून राबवल्या जातात.
आता आपण प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेबाबत जाणून घेऊ. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही आयुष्मान भारत योजनेहून वेगळी आहे का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. आयुष्मान भारत योजनेलाच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, असे म्हणतात. २३ सप्टेंबर २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात ही योजना सुरू केली. ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य विमा योजना आहे.
आरोग्य विमा योजना असण्याचा मुख्य फायदा म्हणजे व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेताना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. त्याचबरोबर अनेक नागरिकांना वैद्यकीय बिल भरण्यासाठी अनौपचारिकपणे पैसे उधार घ्यावे लागतात. त्यामुळे ते कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका निर्माण होतो. मात्र, प्रधानमंत्री आयुष्मानसारख्या योजनांमुळे हा धोका टाळता येतो. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार घेता येतात.
सर्वसामान्यांना मोफत आरोग्याच्या सेवा मिळाव्यात यासाठी आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली. २०२४ मध्ये या योजनेत काही बदल झाले. आता या योजनेचे नेमके काय फायदे आहेत? हे आपण जाणून घेऊ…
या योजनेंतर्गत कोरोना, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात.
आयुष्मान भारत योजनेचे फायदे काय?
१. प्रति कुटुंब ५ लाख रुपयांचा विमा
५० कोटी लोकांना लाभार्थींना सेवा देण्याचे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळते. केंद्र व राज्य सरकार ६०:४० या प्रमाणात दरवर्षी या योजनेसाठी पैसे भरतात.
२. एसईसीसी (SECC)अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व कुटुंबांना योजनेचा लाभ
२०११ साली करण्यात आलेल्या सामाजिक-आर्थिक जणगणनेतील लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येतो. ग्रामीण भागातील आठ कोटी आणि शहरी भागातील दोन कोटी कुटुंबांना आयुष्मान भारत योजेनाचा लाभ घेता येतो.
३. मुली, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य
या योजनेत कुटुंबाच्या आकारावर कोणतेही बंधन नाही. मात्र, तरीही महिला, लहान मुले, विशेषत: मुली आणि ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.
४. दुय्यम व तृतीय आरोग्य सेवा
गरजूंना कार्डिओलॉजिस्ट व युरोलॉजिस्टकडून मोफत उपचारांची सेवा दिली जाते. तसेच कर्करोग, हृदय शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण यांसारखे उपचारदेखील आयुष्मान भारत योजनेंतर्गत केले जातात. तसेच इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आर्थिक साह्य वाढवून मिळते.
५. आधीपासूनच्या आजारांवरदेखील उपचार
आयुष्मान भारत योजनेत एखाद्या व्यक्तीला जर भूतकाळात काही आजार असतील, तर त्यावरदेखील उपचार घेता येतात.
६. कॅशलेस उपचार
योजनेंतर्गत रुग्णालयात दाखल झाल्यावर कोणतेही पैसे न भरता उपचार मिळतात, ज्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात.
७. खर्च कमी
सार्वजनिक, तसेच आयुष्मान भारत योजनेंतर्गत समाविष्ट असलेली रुग्णालये रुग्णांकडून वैद्यकीय उपचारांसाठी अधिक पैसे आकारू शकत नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार कमी होऊन सेवा गतीने मिळण्यास मदत होते.
८. नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा
आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यात आयुष्मान भारत योजनेचा हातभार लागतो. आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना योग्य वेळी आरोग्यविषयक आणि आर्थिक मदत मिळते.
९. आधी आणि नंतरचा खर्च
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि उपचारानंतरही काही खर्च योजनेत समाविष्ट आहेत. म्हणजेच रुग्णाला डिस्चार्जनंतरची काळजी आणि संबंधित औषधोपचार यांसाठीदेखील आर्थिक साह्य मिळते.
१०. ज्येष्ठ नागरिकांना लाभ
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत विशेष लाभ मिळतो.
११. एकापेक्षा जास्त शस्त्रक्रियांवर उपचारांसाठी आर्थिक साह्य
आयुष्मान भारत योजनेंतर्गत एकापेक्षा जास्त शस्त्रक्रियांसाठी आर्थिक साह्य मिळते. त्यानंतरच्या प्रक्रिया कमी दराने कव्हर केल्या जातात. दुसऱ्या आणि तिसऱ्या शस्त्रक्रियेसाठी अनुक्रमे ५०% व २५% दराने उपचार केले जातात.
१२. व्यापक कव्हरेज
ऑन्कोलॉजी (oncology), कार्डिओलॉजी (cardiology) व ऑर्थोपेडिक्स (orthopaedics)सह २७ विशेष क्षेत्रांचा समावेश आहे.
या योजनेत सरकारी आणि खासगी अशी दोन्ही रुग्णालये समाविष्ट आहेत, ज्यामुळे नागरिकांना उपचारांसाठी अधिक पर्याय मिळतात. तसेच, ही योजना देशभरात लागू असल्याने देशभरात कुठेही उपचार घेता येतात.
आता शासनाच्या इतर आरोग्य योजनांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ…
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्ष १.५० लाखाचे विमा संरक्षण दिले जाते. तसेच, १२०९ उपचारांसाठी प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते.
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम(JSSK)
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या आरोग्यासाठी राबवली जाते. या योजनेंतर्गत गर्भवती महिला व नवजात बालकांना मोफत उपचार, औषधे, आहार व वाहतूक सुविधा पुरवली जाते.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (RBSK)
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम ही योजना बालकांच्या आरोग्यासाठी आहे. त्यामध्ये १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आरोग्य सेवा पुरवल्या जातात.