कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात सोमवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे सांगण्यात आले. कोलकात्यामध्ये गेल्या चार दशकातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस अभूतपूर्व असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आणि नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

कोलकात्यात २४ तासांपेक्षा कमी अवधीमत २५१.४ मिमी पाऊस नोंदवण्यात आला. येथे १९८६पासून पडलेला हा सर्वात जास्त पाऊस असून, गेल्या १३७ वर्षांमध्ये हा सहाव्या क्रमांकाचा पाऊस असल्याची माहिती देण्यात आली. या अतिवृष्टीमुळे कोलकात्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळे आले, शैक्षणिक संस्था बंद राहिल्या आणि राज्यातील सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या दुर्गापूजेसाठी दिली जाणारी सुट्टी आधीच जाहीर करावी लागली.

दुर्गापूजा पुढील आठवड्यात सुरू होत आहे. त्यापूर्वी पाऊस सामान्य होईल अशी जनतेची अपेक्षा होती पण सोमवार आणि मंगळवारच्या पावसाने ती फोल ठरवली. पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मेट्रो आणि रेल्वेसेवा खंडित झाल्या. तसेच हवाई वाहतुकीचे वेळापत्रकही कोलमडले.

फराक्का धरणातून अनियमितपणे पाणी सोडण्यात आल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच, विजेचा धक्का बसून नऊ जणांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी ‘सीईएससी’ या खासगी ऊर्जा कंपनीच्या निष्काळजीपणावर टीका केली.

मी अशा प्रकारचा पाऊस कधीही पाहिला नाही. एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ जणांचा मृत्यू विजेच्या उघड्या किंवा नादुरुस्त तारांमुळे धक्का बसून झाला. कोलकात्यामध्ये आठ तर शेजारील जिल्ह्यांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ‘सीईएससी’ने मृतांच्या नातेवाईकांना नोकरी दिली पाहिजे. तसेच त्यांना किमान पाच लाख रुपये नुकसानभरपाई दिली पाहिजे. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

चीनला ‘रागासा’ चक्रीवादळाचा धोका

बीजिंग : ‘रागासा’ हे चक्रीवादळ चीनच्या किनाऱ्यावर धडकण्यापूर्वी ग्वांगडाँग प्रांतामधील जागतिक उत्पादन केंद्र बंद करण्यात आले. त्यापूर्वी तेथील ३.७१ लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. शेन्झेनसारखी शहरे बंद करण्यात आली आहेत. ‘रागासा’ हे चीनला धडकणारे गेल्या काही वर्षांतील सर्वात शक्तिशाली वादळ असल्याचे सांगण्यात आले.