Kolkata Law student rape Case TMC MLA controversial remark : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका लॉ कॉलेजमध्ये २४ वर्षीय विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याच्या अवघ्या दोन दिवसानंतर तृणमूल काँग्रेसचे कामरहाटी येथील आमदार मदन मित्रा यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “पीडित मुलगी गेली नसती किंवा तिच्या मित्रांना बरोबर घेऊन गेली असती तर ही घटना टाळता आली असती,” असे विधान त्यांनी केले आहे.
शनिवारी माध्यमांशी बोलताना मित्रा म्हणाले की, “जर ती मुलगी गेली नसती तर हे घडले नसते.” तसेच ते पुढे बोलताना असेही म्हणाले की, “जर तिने कोणाला कळवले असते किंवा दोन मित्रांना बरोबर घेऊन गेली असती तर हे टाळता आले असते.”
पक्षाचे म्हणणे काय?
मित्रा यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यानंतर टीमसीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. मित्रा आणि कल्याण बॅनर्जी यांनी केलेली वादग्रस्त विधाने ही त्यांची वैयक्तिक पातळीवर केली आहेत. एक्सवर दिलेल्या अधिकृत निवेदनात पक्षाने या विधानांशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे आणि या विधानांचा तीव्र निषेध देखील केला आहे.
“दक्षिण कोलकता लॉ कॉलेजमधील घृणास्पद गुन्ह्याबद्दल खासदार कल्याण बॅनर्जी आणि आमदार मदन मित्रा यांनी केलीली विधाने ही त्यांच्या वैयक्तिक पातळीवर केलीली आहेत. पक्ष त्यांच्या विधानांपासून स्वत:ला पूर्णपणे वेगळे करतो आणि त्यांचा तीव्र निषेध करतो. त्यांनी व्यक्त केलेले विचार हे पक्षाची भूमिका नाहीत. आमची भूमिका ठाम आहे. महिलांविरोधातील घृणास्पद गुन्ह्यांबाबत आम्ही कसलीही सहनशीलता बाळगत नाहीत आणि या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना शक्य तितक्या कठोर शिक्षेची मागणी करतो,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.
मित्रा यांनीही या गुन्ह्याचा निषेध केला असून याला त्यांनी घृणास्पद म्हटले आहे. याबोरबर या प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणालाही पक्ष सोडणार नाही असेही ते म्हणाले आहेत. मित्रा यांनी नंतर त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न देखील केला आणि म्हणाले की, “ही घटना मुलींसाठी एक संदेश बनली पाहिजे- जर कोणी कॉलेज बंद असताना बोलवत असेल… तर जाऊ नका. यातून काहीही चांगलं होणार नाही… ज्या व्यक्तीने हे केलं त्याने परिस्थितीचा गैरफायदा घेतला.
मित्रा यांनी असाही दावा केला ही या प्रकरणातील मुख्य आरोपी हा आता टीएमसीशी संबंधित नाही. “टीएमसी हा मोठा पक्ष आहे. सर्वत्र असे अनेक लोक आहेत जे टीएमसीशी संबंधित असल्याचा दावा करतात. आम्ही कोणाबरोबरही फोटो काढून घेतो- पण व्यक्तीच्या आत काय आहे हे फक्त एक मानसशास्त्रज्ञच सांगू शकतो. लोक तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत फोटो काढतात आणि नंतर स्वतःला तृणमूल काँग्रेसचे नेते म्हणवून घेऊ लागतात.”