मणिपूरमधील चुराचंदनपूर येथील कुकी पोलीस हवालदाराच्या निलंबनानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या निलंबनाविरोधात शेकडोंचा जमाव चुराचंदनपूर येथील पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. परिणामी उडालेल्या गोंधळात अनेकजण जखमी झाले आहेत. गुरुवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी ही घटना घडली.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी चुराचंदनपूरचे एसपी शिवानंद सर्वे यांनी चुराचंदनपूर जिल्हा पोलिसांत हवालदार पदावर असणाऱ्या एका पोलिसाला निलंबित करण्याचा आदेश दिला. निलंबित पोलीस हवालदार गावातील सशस्त्र लोकांसोबत शस्त्र घेऊन उभे असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवानंद सर्वे यांनी हा निर्णय घेतला. मात्र या निर्णयानंतर कुकी समाजाकडून रोष व्यक्त करण्यात आला. कुकी समाजाच्या पोलिसावर कारवाई करण्यात आली. मात्र अशाच प्रकारची कारवाई मैतैई समाजातून येणाऱ्या पोलिसांवर करण्यात येत नाही, असा आरोप स्थानिकांनी केला. याच रोषातून येथे काही ठिकाणी हिंसाचाराच्या तसेच जाळपोळीच्या घटना घडल्या.
“सुर्वे यांनी २४ तासांच्या आत जिल्हा सोडून जावे”
चुराचंदनपूर येथील कुकी लोकांच्या स्थानिक आदिवासी लीडर्स फोरम (आयटीएलएफ) या संघनटनेने एसपी सुर्वे यांना थेट इशारा दिला आहे. सुर्वे यांनी २४ तासांच्या आत जिल्हा सोडून जावे, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही घटनांना सुर्वेच जबाबदार राहतील, असे या संघटनेने म्हटले आहे.
पोलिसांचे मत काय?
दरम्यान, कुकी समाजाच्या पोलिसाला निलंबित केल्यामुळे चुराचंदनपूर या भागात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार साधारण ३०० ते ४०० लोक पोलीस ठाण्यावर चालून आले. त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या हिंसाचाराचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. आक्रमक जमावाने काही ठिकाणी जाळपोळ केल्याचेही या व्हिडीओंमधून दिसत आहे. पोलिसांची काही वाहनेही जाळण्यात आल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. एका व्हिडीओमध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही भाग जाळण्यात आल्याचे दिसत आहे.
या आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनाही बळाचा वापर करावा लागला. यामध्ये आरएएफ दलाचाही समावेश होता. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरएएफ दलाने काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.