नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेली १७ वर्षे रखडलेले ‘कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र’ आता प्रत्यक्षात सुरू होऊ शकेल. अध्यासनाचे उद्घाटन गुरुवार, २४ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर खडबडून जाग आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालय व ‘जेएनयू’ प्रशासनाने काही तासांत समारंभाची तारीख निश्चित केली. कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिकाही तयार केली असून ती संबंधितांना पाठवण्यात आल्याचे समजते.
कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राच्या उद्घाटन समारंभाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज सामरिक व संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभही आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही कार्यक्रम मुख्यमंत्री फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मराठी भाषामंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. जेएनयूच्या कन्व्हेशन सेंटरमध्ये २४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेवर समन्वयक या नात्याने डॉ. जे. जगन्नाथन व डॉ. अरविंद येलेरी यांचाही उल्लेख आहे.
‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल घेऊन राज्य सरकारने अध्यासन केंद्राची सद्यास्थिती जाणून घेतली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासन व मुख्यमंत्री कार्यालयाने केंद्राच्या उद्घाटनाला मान्यता देत तारीखही निश्चित केली. कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्रासाठी राज्य सरकारकडून निधीची तरतूदही करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्य सरकारकडून जेएनयूला निधी पुरवला गेला तर यंदाच्या शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) हे केंद्र कार्यान्वित होऊ शकेल. राज्य सरकारने दोन्ही अध्यासन केंद्राना प्रत्येकी दहा कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. केंद्रांचा उद्घाटन समारंभ २७ फेब्रुवारी रोजी, मराठी भाषा गौरवदिनी होणार होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापासून राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या नाराजीमुळे हा समारंभ रद्द करण्यात आला होता.
निमंत्रणपत्रिकेवर ‘नाराज’ मंत्र्यांची नावे
●मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यास शनिवारी होकार दिल्यानंतर विद्यापीठाने कार्यक्रमाची तारीख ठरवून निमंत्रणपत्रिका छापल्या.
●विशेष म्हणजे या पत्रिकांवर नाराज मंत्र्यांचा नामोल्लेख करण्यात आला आहे. तसेच समारंभाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यामुळे ‘जेएनयू’ प्रशासनाने भाजप व संघाचीदेखील नाराजी दूर केल्याचे स्पष्ट झाले आहे.