नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) ज्येष्ठ कवी-साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र सुरू केले जाणार असून त्यासाठी १० कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा मराठी भाषा व उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

‘जेएनयू’मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची प्रक्रियाही मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात येईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली. ‘जेएनयू’मध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय २००५ मध्ये राज्य सरकारने घेतला होता. जेएनयूच्या विनंतीनुसार १० कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी वा संशोधनासाठी दिल्लीत वास्तव्य करतात. त्यांच्यासाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. दिल्लीतील मराठी शाळांना निधी पुरवण्याचा निर्णयही घेतला आहे, असे सामंत म्हणाले. ‘जेएनयू’ने विद्यापाठाच्या आवारात जागा दिली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा केला जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी पुरवला जातो. त्यातील काही निधी ‘जेएनयू’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भवन उभारण्यासाठी वापरला जाईल. दोन्ही अध्यासन केंद्रांसाठी आवश्यक ग्रंथालय इथे सुरू होऊ शकते, असे सामंत म्हणाले. साहित्य संमेलनासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याचाही विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तालकटोरा स्टेडियमला भेट देऊन सामंत यांनी तयारीची पाहणी केली. संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव दिले जाईल. अतिविशिष्ट प्रवेशद्वार थोरले बाजीराव पेशवे नावाने ओळखले जाईल, अशी माहिती सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी दिली.