Ladakh 534 govt jobs 50000 people applied : लडाखमध्ये गेल्या काही दिवसांपासून बेरोजगारी आणि पूर्ण राज्याचा दर्जा या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. यादरम्यान या केंद्र शासित प्रदेशामधून एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे. लेह स्वायत्त पर्वतीय विकास अधीनस्थ सेवा भरती मंडळाच्या (Leh Autonomous Hill Development Subordinate Services Recruitment Board) भरतीसाठी ५० हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत. विशेष बाब म्हणजे या भरतीमध्ये एकूण ५३४ रिक्त जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीची अधिसूचना १६ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आली होती.
लेहच्या जिल्हा रोजगार आणि सल्लागार केंद्राचे उप निदेशक रहमतुल्लाह बट यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, जुलैमध्ये एकूण ५३४ रिक्त जागांसाठी या भरतीची अधिसूचना जारी केली गेली होती. ज्यासाठी ५० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. बट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरतीसाठीची परीक्षा नोव्हेंबरच्या आधी किंवा दुसर्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
दर सहा पैकी एका नागरिकाचा अर्ज
लडाख हा सर्वात मोठा केंद्र शासित प्रदेश आहे, मात्र लक्षद्वीपनंतर दुसरे सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. याची अंदाजे लोकसंख्या सुमारे ३,००,००० इतकी आहे. म्हणजेच दर सहा व्यक्तीपैकी एकाने या नोकरीसाठी अर्ज केलेला आहे.
मागील दोन महिन्यांमध्ये लडाख रिसर्च स्कॉलर्स फोरम नाव असलेल्या गटाचे सदस्य थुपस्तान त्सावांग यांनी लेह स्वायत्त पर्वतीय विकास अधीनस्थ सेवा भरती मंडळाच्या पोर्टवर फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांची मदत केली आहे. त्सावांग यांनी दावा केला की ५३४ गॅजेटेड नोकऱ्यांसाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये ६० हजार उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यांनी सांगितले की या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी काही लोक तर चंदीगड पर्यंत गेले आणि परत आले. तर काहींनी हा चक्रावून टाकणारा अर्ज भरण्यासाठी २० हजारांपर्यंत पैसे देखील खर्च केले.