लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्रा हे केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांचे पुत्र आहेत. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चारचाकी वाहनाने चिरडल्याचा आरोप आशिष मिश्रा यांच्यावर आहे. याप्रकरणी आशिष मिश्रा मागील एक वर्षापासून तुरुंगात आहेत. त्यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज अखेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
खटला संपेपर्यंत एखाद्या आरोपीला तुरुंगात ठेवणं, योग्य नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं. यानंतर न्यायालयाने आशिष मिश्रा यांना अटींसह आठ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. ट्रायल कोर्टातील सुनावणी व्यतिरिक्त आशिष मिश्रा यांना उत्तर प्रदेशात जाता येणार नाही. तसेच त्यांना दिल्लीतही राहता येणार नाही. अंतरिम जामिनाच्या कालावधीत आशिष मिश्रा कुठे राहतील? याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला आणि न्यायालयाला द्यावी, असं सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्च रोजी होणार आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या खंडपीठाने आशिष मिश्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने म्हटलं की, कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेतील संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर आठवडाभरात आशिष मिश्रा यांना उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोडावं लागेल. त्याचबरोबर त्यांचा पासपोर्टही न्यायालयात जमा करावा लागेल.