मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेला लष्कर ए तोयबाचा अतिरेकी झाकी उर रहमान याच्या जामिनाविरोधात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्या निषेधाचा ठराव भारताने मांडला होता. तो चीनने रोखला आहे. भारताने लख्वीच्या विरोधात काही पुरावेच दिले नाहीत, असे सांगून चीनने पाकिस्तानची पाठराखण केली.
राष्ट्रसंघाच्या र्निबध समितीची बैठक झाली. त्यात भारताने २६/११च्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार लख्वी याची तुरुंगातून सुटका केल्याबाबत पाकिस्तानकडे स्पष्टीकरण मागितले, पण चीनच्या प्रतिनिधींनी हा ठराव रोखला. भारताने पुरेसे पुरावेच दिले नाहीत, त्यामुळे पाकिस्तानने स्पष्टीकरण देण्याचा प्रश्नच येत नाही असे चीनच्या प्रतिनिधींनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध समितीचे अध्यक्ष जिम मॅकले यांना पाठवलेल्या पत्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी म्हटले होते, की लख्वी याला पाकिस्तानने सोडून दिल्याने संयुक्त राष्ट्रांच्या ठराव क्रमांक १२६७चे उल्लंघन केले आहे. हे र्निबध व्यक्ती, देश, अतिरेकी संघटना यांना लागू आहेत. र्निबध समितीचे पाच स्थायी सदस्य देश आहेत तर १० अस्थायी सदस्य आहेत. लख्वीच्या सुटकेने अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने चिंता व्यक्त केली होती. त्याला फेरअटक करण्यात यावी असे मत या देशांनी मांडले होते. मुंबई हल्लाप्रकरणी अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल, हमद अमीन सादिक, शाहीद जमील रियाध, जमील अहमद व युनुस अंजुम यांच्यावर मुंबई हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आखल्याचा आरोप आहे. लख्वी हा ५५ वर्षांचा असून तो लष्कर ए तोयबाचा संस्थापक व जमात उद दवाचा प्रमुख हाफिझ सईद याचा नातेवाईक आहे. त्याला डिसेंबर २००८ मध्ये अटक झाली होती. २५ नोव्हेंबर २००९ रोजी त्याच्यावर इतर सहा जणांसह आरोप ठेवून सुनावणी करण्यात आली होती. पाकिस्तानी न्यायालयाने ९ एप्रिलला त्याला सोडून देण्याचा आदेश दिला. त्यानंतर भारताने पाकिस्तानने सीमावर्ती दहशतवादावर दुटप्पी भूमिका घेतल्याचा व आश्वासनभंगाचा आरोप केला होता.