बिहारच्या राजकारणातील एकमेकांचे राजकीय हाडवैरी म्हणून प्रसिद्ध असलेले माजी रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन्ही नेते तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र आले. एकमेकांवर वारंवार चिखलफेक करणाऱ्या या नेत्यांनी बिहार विधानसभेच्या पोटनिवडणुकांचे निमित्त साधत एका व्यासपीठावर एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. जातीयवादी पक्षांचा सामना करण्यासाठी धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शक्तींनी एकत्र आले पाहिजे, असे सांगत दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
खुमासदार भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या लालुप्रसाद यांनी नितीश कुमार यांना आपले ‘छोटे भाई’ असे संबोधत त्यांचे स्वागत केले. ‘‘केवळ बिहारच्या राजकारणात बदल घडविण्यासाठी आम्ही एकत्र आलो नाहीत, गरिबांच्या आणि शोषितांच्या विकासासाठी आम्ही ऐक्य केले आहे. आमच्या ‘युती’ची दखल राष्ट्रीय राजकारणालाही घ्यावी लागेल,’’ असे सांगत लालूंनी केंद्र सरकारला एक प्रकारे इशाराच दिला. गरिबांच्या अधिकारासाठी नितीश आणि आम्ही एकत्र आलो. आता आमची मुलायमसिंह यादव आणि मायावती यांना विनंती आहे की त्यांनीही जनतेच्या भल्यासाठी आम्हाला साथ द्यावी आणि एकत्र यावे, असे लालूप्रसाद म्हणाले.
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हाजिपूर मतदारसंघात संयुक्त जनता दलाचे राजेंद्र राय उभे असून, त्यांच्या प्रचारासाठी हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले होते. या वेळी नितीश कुमार यांनी भाजपवर यथेच्छ तोंडसुख घेतले. ‘‘भाजपला राज्यातून हद्दपार करणे गरजेचे आहे. अफवांचे पीक पसरवून आणि जनतेला खोटी स्वप्ने दाखवून केंद्रात भाजप सरकार आलेले आहे. मात्र आमच्या प्रचारांमध्ये आणि त्यांच्या प्रचारांमध्ये फरक आहे. जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,’’ असे नितीश म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
लालू-नितीश यांच्यात ‘ऐक्य’ ; भाजपशी लढण्याचा निर्धार
बिहारच्या राजकारणातील एकमेकांचे राजकीय हाडवैरी म्हणून प्रसिद्ध असलेले माजी रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन्ही नेते तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र आले.
First published on: 11-08-2014 at 05:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu nitish share stage after 21 years vow to fight communal forces