काश्मीरमधील सीआरपीएफच्या बसवरील हल्ला प्रकरण

काश्मीरमधील पांपोर येथे गेल्या २५ जूनला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) एका बसला लक्ष्य करून आठ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी (फिदायीन) दहशतवाद्यांना वाहनातून आणणाऱ्या चालकाची सुरक्षा यंत्रणांनी ओळख पटवली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या हल्लेखोरांनी गुलमर्गच्या उंच पर्वतराजीच्या मार्गाने काश्मीर खोऱ्यात प्रवेश केला, असे संकेत आतापर्यंतच्या तपासावरून मिळत आहेत.

पांपोर येथे २५ जून रोजी झालेल्या या भीषण हल्ल्याच्या चार दिवस आधी एका चालकाने लष्करच्या ४ दहशतवाद्यांना येथून ५७ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबा रेशी येथून वाहनाने आणून पुलवामा जिल्ह्य़ातील एका सुरक्षित घरी लपवले होते, असे अधिकृत सूत्रांनी रविवारी सांगितले. या चालकाची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

हल्ल्याच्या दिवसापासून भूमिगत झालेला हा चालक या दहशतवादी संघटनेचा कार्यकर्ता (ओव्हरग्राऊंड वर्कर) असल्याचे स्थानिक पोलिसांना माहिती होते, मात्र त्याच्याविरुद्ध काही पुरावा नसल्याने त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली नाही असे सूत्रांनी सांगितले. आता मात्र सुरक्षा यंत्रणा या चालकाची कसून चौकशी करत आहेत.

सुरक्षा यंत्रणांनी आतापर्यंत गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे घटनाक्रमाची साखळी गुंफली आहे. त्यानुसार चार ‘फिदायीन’ (आत्मघातकी) हल्लेखोर उत्तर काश्मीरमधील गुलमर्गच्या उंचावरील भागातून खोऱ्यात घुसले आणि एका टाटा सुमो वाहनातून दक्षिण काश्मीरमध्ये पोहोचले.

या सर्व दहशतवाद्यांनी सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गाची टेहळणी करून, उद्योजकता विकास संस्थेपासून (ईडीआय) केवळ ३ किलोमीटर दूर असलेल्या हल्ल्याच्या ठिकाणाची निवड केली. याच ठिकाणी लष्करच्या दहशतवाद्यांनी सैन्याचे दोन अधिकारी व तीन सैनिक यांना या वर्षी फेब्रुवारीत गोळ्या घालून ठार मारले होते.