नवी दिल्ली : भाजपने मंगळवारी प. बंगाल सरकारच्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी राज्य सचिवालयावर काढलेल्या मोर्चातील निदर्शक-आंदोलकांची धरपकड झाली होती. त्यानंतर भाजपने ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री ममता यांच्या सरकारच्या काळात प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थाच नष्ट झाली असून राज्य दिवाळखोर झाले आहे. भाजपच्या सदस्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांद्वारे अत्याचार केला जात आहे. 

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी ममता यांच्यावर आरोप करताना म्हटले, की भाजप कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करून ममता बॅनर्जी त्यांच्या तृणमूल काँग्रेसअंतर्गत गटबाजीवरून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. ममता बॅनर्जी बंगालबाहेर लोकशाही वाचवण्याची भाषा बोलतात. मात्र आपल्या राज्यातील लोकांच्या लोकशाही आणि नागरी हक्कांवर अंकुश ठेवण्यासाठी त्या सर्व मर्यादा ओलांडतात. आवाज उठवण्याचा विरोधी पक्षाचा न्याय्य अधिकार नाकारला जात आहे.

मुख्यमंत्री ममतांनी तळागाळातून पुढे येत पूर्वीच्या डाव्या शासनाविरुद्ध केलेला दीर्घ संघर्ष लक्षात घेता, त्यांचे सध्याचे आचरण त्यांच्या राजकीय वाटचालीच्या विपरीत असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यातील मतभेदांचे संकेत देत त्यांनी ‘तृणमूल’मध्ये उत्तराधिकारी पदासाठी संघर्ष सुरू आहे का, असा सवालही केला.

पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आपले सुमारे हजारांवर कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. ममता बॅनर्जी यांनी अत्याचारात पूर्वीच्या साम्यवादी पक्षांनाही मागे टाकल्याची टीकाही भाजपने केली आहे.

संयम बाळगून गोळीबार टाळला : ममता

कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले, की राज्य सचिवालयावर मोर्चाच्या नावाखाली हिंसक झालेल्या भाजपच्या आंदोलकांनी मंगळवारी गोळीबारही केला असता. मात्र, सरकारने जास्तीत जास्त संयम बाळगला. या आंदोलनासाठी भाजपने बाहेरील राज्यांतून गाडय़ांतून बॉम्बसह सशस्त्र गुंड आणल्याचा आरोपही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यातील निमतौरी येथे प्रशासकीय बैठकीत बोलताना ममता यांनी सांगितले, की त्या मोर्चातील आंदोलकांनी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर क्रूर हल्ला केला. पोलीस गोळीबार करू शकले असते, परंतु आमच्या प्रशासनाने प्रचंड संयम दाखवला. बंगालचा सर्वात मोठा सण असलेल्या दुर्गापूजेला काही आठवडे बाकी असताना निषेध मोर्चामुळे प्रवाशांची आणि व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. आम्ही हे होऊ देणार नाही. कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधितांना अटक केली जात आहे.