Law student rape in Kolkata कोलकाता येथील विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणाने पुन्हा एकदा कोलकाता हादरलं आहे. आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि महाविद्यालयात जशी घटना घडली होती त्याच घटनेची आठवण अनेकांना या नव्या घटनेमुळे आली आहे. दरम्यान या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती भक्कम पुरावा सापडला आहे. या प्रकरणातील आरोपीच्या फोनमधून गुन्ह्याचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला आहे. या प्रकरणाला दोन दिवस झाल्यानंतर तृणमूलचे आमदार मदन मित्रा यांनी एक वक्तव्य केलं आहे ज्यामुळे आता वाद पेटण्याची चिन्हं आहेत.
काय म्हटलंय तृणमूलचे आमदार मदन मित्रा यांनी?
मदन मित्रा असं म्हणाले आहेत की ती मुलगी तिकडे गेलीच कशाला? ती गेली नसती तर ही सगळी घटना घडलीच नसती. कॉलेज बंद असताना मुलींना जर कुणी युनिटमध्ये पद देतो म्हणून बोलवत असेल तर जाऊ नका. बलात्काराच्या या घटनेने मुलींना हाच संदेश दिला आहे. ती मुलगी नाही म्हणाली असती तर घटना घडली नसती. शिवाय तिला जायचंच होतं तर ती एकटी का गेली? तिने तिच्या मित्रांना तरी बरोबर घेऊन जायचं होतं. ज्यांनी बलात्कार केला त्यांनी मुलगी एकटी आहे या संधीचा फायदा घेतला. असं वक्तव्य मदन मित्रांनी केलं आहे. त्यामुळे यावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.
ही घटना नेमकी काय आहे?
एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली, ज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी मोनोजित मिश्रा (३१) आणि दोन विद्यार्थी झैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) यांचा समावेश आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी पीडितेला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये नेले आणि तिला तिथून पळून जाण्यापासून रोखले, यादरम्यान मिश्राने तिच्यावर बलात्कार केला असाही आरोप आहे.
पीडितेने काय म्हटलंं आहे?
पीडित विद्यार्थिनीने हा आरोप केला आहे की लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी तिचा व्हिडिओ बनवला, त्यानंतर त्यांनी त्या व्हिडीओचा वापर करून त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. “आम्ही तो व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता का? किंवा तो इतरांबरोबर शेअर केला होता याची पडताळणी करत आहोत,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भाजपाचा नेमका आरोप काय?
दरम्यान या घटनेनंतर पश्चिम बंगालमधलं राजकारण तापलं आहे. सामूहिक बलात्कारातले सगळे आरोपी हे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबाबत बंगालची माफी मागितली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले राज्यात तृणमूल पुरस्कृत क्रौर्य, अपराध आणि राजकारण केलं जातं आहे.