Law Student Rape inside Kolkata college Case: कोलकाता येथे कॉलेजमध्ये एका कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा कोलकाता हादरलं आहे. दरम्यान या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती भक्कम पुरावा सापडला आहे. या प्रकरणातील आरोपीच्या फोनमधून गुन्ह्याचा व्हिडीओ पोलिसांना सापडला आहे. हा व्हिडीओ या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. हा व्हिडीओ सापडल्याची माहिती या प्रकारणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे.
एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर कथितपणे बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, यानंतर पोलिसींनी तीन जणांना अटक केली, ज्यामध्ये कंत्राटी कर्मचारी मोनोजित मिश्रा (३१), जो टीएमसी विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी देखील आहे आणि दोन विद्यार्थी झैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) यांचा समावेश आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी पीडितेला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये नेले आणि तिला तिथून पळून जाण्यापासून रोखले, यादरम्यान मिश्राने तिच्यावर बलात्कार केला असा आरोप आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात शनिवारी चौथ्या व्यक्ती कॉलेजचा सुरक्षा रक्षक याला अटक केली आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, बलात्कार करण्यापूर्वी गार्डला त्याची खोल रिकामी करण्यास सांगण्यात आले. “आम्हाला त्याच्या जबाबात विसंगती आढळली, आणि महिलेने त्याच्याविरोधात थेट तक्रार केली आहे. त्याच्या भूमिकेचा तपास केला जात आहे,” असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या सुरक्षा रक्षकाचे नाव पिनाकी बॅनर्जी असून तो खरदहाचा रहिवासी आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
तक्रारीत पीडित महिलेने आरोप केला आहे की लैंगिक अत्याचारादरम्यान आरोपींनी तिचा व्हिडिओ बनवला, त्यांनंतर त्यांनी त्या व्हिडीओचा वापर करून त्यांनी तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. “आम्ही तो व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता किंवा तो इतरांबरोबर शेअर केला होता याची पडताळणी करत आहोत,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी सांगितले की ते २५ जूनचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत, जेणेकरून घटनाक्रम समजून घेता येईल. तसेच पोलीस सूत्रांनी सांगितलं की यूनियन रुमच्या जवळ उपस्थित असलेल्या एका दुसऱ्या विद्यार्थ्याची देखील चौकशी केली जाईल.
तसेच पीडित महिलेशी झालेल्या कथित हातापायीवेळी त्यांना जखमा झालेल्या आहेत का हे तपासण्यासाठी तिन्ही आरोपींची वैद्यकीय-कायदेशीर चाचणी केली जाईल असेही सांगण्यात आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मिश्रा हा लॉ कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे आणि सध्या तो कॉलेजमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. तो विद्यार्थी असताना तृणमूल छात्र परिषदेचा नेता होता. तर टीएमसीने त्याचा सध्या पक्षाशी कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे.