सर्व पक्षांचे नेते पुढील पिढीचा मार्ग मोकळा करीत असल्याचे मत केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम हे तामिळनाडूच्या शिवगंगा मतदारसंघातून आपला पुत्र कार्ती याला उभे करीत असल्यासंदर्भात शर्मा बोलत होते.चिदम्बरम हे शिवगंगा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास उत्सुक नसून तेथे ते आपल्या मुलास उतरविणार असल्याच्या बातम्यांच्या संदर्भात पत्रकारांनी शर्मा यांना विचारणा केली होती. त्याच वेळी तामिळनाडूमधून काँग्रेस पक्ष एकाकी पडत असल्याचा त्यांनी इन्कार केला. याच पाश्र्वभूमीवर चिदम्बरम आणि अन्य ज्येष्ठ नेते पराभवाच्या भीतीने निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढीत असल्याच्या चर्चेचे शर्मा यांनी स्पष्टपणे खंडन केले. शर्मा यांनी या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे उदाहरण दिले. सिन्हा यांचे चिरंजीव जयंत हेही झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघातून निवडणूक लढवित असल्याचे शर्मा यांनी सांगितले. यशवंत सिन्हा हे निवडणूक हरणारे नेते आहेत काय, पराभवाच्या भीतीपोटीच त्यांनी मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले काय, अशीही विचारणा शर्मा यांनी केली. मी पक्षाच्या मध्यवर्ती समितीत नाही, मात्र चिदम्बरम यांना नेहमी भेटतही असतो. मला यासंबंधी तसे काही देणेघेणे नाही, असे सांगत सर्व पक्षांमधील नेते पुढील पिढीचा मार्ग मोकळा करीत असल्याचे शर्मा यांनी नमूद केले.