जम्मू-काश्मीरमधील लडाख भागातील लेह या प्रमुख शहराचे रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्यामुळे या शहराने चालू मोसमातील सर्वाधिक गारठून टाकणारी रात्र अनुभवली. खोऱ्यातील बहुतांश ठिकाणी किमान तापमानात किंचितशी वाढ झाली.
लेह येथे उणे १२.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. ते आदल्या रात्रीच्या तापमानापेक्षा (-४.६ अंश) सात अंशांहून अधिक घसरले होते. या शहरासाठी ही या मोसमातील सर्वाधिक थंड रात्र होती, असे हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी २ डिसेंबरला उणे ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. काश्मीर खोऱ्यात रात्रीचे तापमान कमी झालेले श्रीनगर हे एकमेव ठिकाण होते. येथे उणे ०.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आदल्या रात्री हा आकडा ०.६ अंश सेल्सिअस होता. स्किइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर काश्मिरातील गुलमर्ग येथे उणे ९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. या मोसमात सर्वात कमी असलेल्या आदल्या रात्रीच्या तापमानापेक्षा (उणे १०.६ अं.से.) यात थोडीशी वाढ झाली होती.

काश्मीर खोऱ्याला जम्मू व अन्य देशांशी जोडणाऱ्या जवाहर बोगद्याजवळ काझीगुंड येथील ‘सीआरपीएफ’ची वाहने रविवारी बर्फाने आच्छादली होती.