करोना उपचारांबाबत भाजपच्या मंत्री, नेत्यांकडून तक्रारी

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे

UP elections Yogi Adityanath B L Santhosh
करोनाची दुसरी लाट हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने योगी सरकार ठरले टीकेचे धनी… भाजपातील नेत्यांकडूनच योगी सरकारवर झाली टीका. (संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे

नवी दिल्ली : बरेली या आपल्या मतदारसंघात करोनाविषयक उपचारांची परिस्थिती वाईट असल्याची तक्रार करणारे पत्र केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लिहिल्यानंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेले काही आठवडे हस्तक्षेप करून या जिल्ह्य़ातील परिस्थितीचा आढावा घेण्याची सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीही आता या परिस्थितीबाबत प्रश्न विचारणे सुरू केले आहे.

आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील ब्रिजेश पाठक यांच्यापासून ते मेरठचे खासदार राजेंद्र अग्रवाल यांच्यापर्यंत आणि मिर्झापूर व मोहम्मदी मतदारसंघांतील पक्षाच्या आमदारांपर्यंत अनेकांनी पुरेशा वैद्यकीय सोयींच्या अभावाबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणे सुरू केले आहे. प्राणवायूचे सिलिंडर्स आणि अतिदक्षता विभागातील खाटा यांच्यासाठी शेकडो दूरध्वनी येत असताना अधिकाऱ्यांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याची तक्रार ते करत आहेत.

आपण झोपलेलो नसून आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ केलेली आहे, तथापि करोनाबाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे परिस्थिती कठीण झाली आहे, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

उत्तर प्रदेशात सर्वात वाईट परिस्थिती असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज, मेरठ, गौतम बुद्ध नगर, गोरखपूर, गाझियाबाद, बरेली व मुरादाबाद यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (वाराणसी) व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्यासह भाजपचे काही उच्चपदस्थ नेते प्रतिनिधित्व करत असलेल्या या जिल्ह्य़ांतील करोनाबाधितांची संख्या राज्यात नोंदवलेल्या करोनाबाधितांच्या एकूण १५.०३ लाख या संख्येपैकी जवळजवळ निम्मी (७.३८ लाख) आहे.

आपल्या मतदारसंघांमधून प्रचंड संख्येत मदतीसाठीचे दूरध्वनी आपल्याला येत आहेत, मात्र आपण त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहोत, असे ‘इंडियन एक्सप्रेस’ने संपर्क साधलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांनी सांगितले.

देशात २४ तासांत ३७५४ जणांचा मृत्यू

सोमवारी देशात तीन लाख ६६ हजार १६१ करोनारुग्णांची नोंद झाली.  बाधितांची एकूण संख्या दोन कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ वर पोहोचली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. देशात करोनामुळे आणखी ३७५४ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या दोन लाख ४६ हजार ११६ वर पोहोचली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Letters from bjp ministers and leaders to the cm yogi adityanath regarding corona treatment zws

ताज्या बातम्या