नवी दिल्ली : देशात विविध ठिकाणी झालेल्या हिंसक घटनांच्या मुद्दय़ांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षप्रमुखांना ‘‘काँग्रेस सरकारांच्या काळातील हिंसक घटनांची मोठी यादी’’ देत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले.

राजस्थानमधील २ एप्रिलला करौलीमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल काँग्रेसने का मौन बाळगले आहे, असा सवाल नड्डा यांनी देशवासीयांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे उपस्थित केला आहे. करौलीमध्ये हिंदू वर्षांरंभानिमित्त (नवसंवत्सर) काढलेल्या मोटारसायकल मिरवणुकीवर मुस्लिमबहुल भागात दगडफेक झाली होती व त्यानंतर हिंसक संघर्ष झाला होता. काँग्रेससह १३ विरोधीपक्ष प्रमुखांनी शनिवारी संयुक्त निवेदनाद्वारे हिंसक घटनांचा निषेध केला होता व मोदींचे मौन धक्कादायक असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नड्डांनी काँग्रेसच्या काळातील हिंसक घटनांची यादी पत्रात नमूद केली आहे.

नोव्हेंबर १९६६ मध्ये गोहत्याबंदीच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या साधुंवर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने गोळीबार केला होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत शिखांविरोधातील हत्याकांड झाले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ‘‘महावृक्ष कोसळतो तेव्हा भूकंप होतात’’ असे विधान करून शीख हत्याकांडाचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले होते.. १९६९ मध्ये गुजरात, १९८० मध्ये मुरादाबाद, १९८४ मध्ये भिवंडी, १९८७ मध्ये मेरठ, १९८९ मध्ये भागलपूर, १९९४ मध्ये हुबळी, १९८०च्या दशकात काश्मीरमधील हिंदूवरील अत्याचार, २०१३ मध्ये मुझफ्फरनगर, २०१२ मध्ये आसाममध्ये हिंसाचार अशा अनेक धार्मिक हिंसाचाराच्या घटना केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना झाल्या होत्या. या घटनांचा काँग्रेसला विसर पडला का, असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात घटनाबाह्य स्थापन केलेल्या ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’ने  विघातक म्हणता येईल असे धार्मिक हिंसाचारविरोधी विधेयक तयार केले होते. काँग्रेस सरकारच्या काळातच दलित आणि आदिवासींविरोधात अत्यंत घृणास्पद अत्याचार केले गेले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुळेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पराभव पत्करावा लागला होता, अशी तीव्र टीका नड्डा यांनी केली.

‘विकासाचे राजकारण करा’

२०१४मध्ये केंद्रात मोदींचे सरकार स्थापन झाल्यापासून देशातील राजकारण बदलले असून विरोधी पक्षांचे ‘मतांचे राजकारण’ कालबाह्य झाले आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या यशाने विकासाच्या राजकारणाला मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट होतो. देशातील तरुण पिढीला विभाजन नव्हे तर, विकासाची अपेक्षा आहे. आता विरोधी पक्षांनी स्वत:मध्ये बदल करून विकासाचे राजकारण करावे, असा सल्लाही नड्डा यांनी पत्राद्वारे दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस धार्मिक हिंसाचारातून राजकीय हित साधत आहे. केरळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. महाराष्ट्रात दोन मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेली आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी पक्षाशी वैचारिक मतभेद जाहीरपणे व्यक्त करणाऱ्यांना लक्ष्य केले जाते. तिथे झुंडबळीच्या घटना होत आहेत. या विरोधी पक्षांसाठी हीच लोकशाही वाटते का?

जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष