भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील विजय शंखनाद रॅलीस संबोधित केले. मुझफ्फरनगरमधील दंगलीनंतर पहिल्यांदाच पश्चिमी उत्तर प्रदेशच्या जाट बहूल क्षेत्रात त्यांची सभा झाली.
दहा वर्षांपू्र्वी गुजरातमध्ये रोज दंगली होत होत्या. चाकू, सुरे चालत होते. मात्र आज गुजरात दंगलमुक्त झाले आहे. उत्तरप्रदेशच्या जनतेनेही भाजपवर विश्वास दाखवावा, आम्ही तुम्हाला दंगलमुक्त उत्तरप्रदेश करुन दाखवू असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष शांतता आणि सौहार्द जपण्याचे राजकारण करते, असा दावा त्यांनी केला. यावेळी मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर तोफ डांगली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशचे सरकार हे भ्रष्ट आहे. समाजवादी पक्ष हा समाजविरोधी पक्ष आहे. सपाच्या नियमांमुळे येथील महिलाही असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेशमध्ये वीज जाणे ही बातमी होत नाही तर, वीज उपलब्ध असेल तर ती बातमी होते. अशी परिस्थिती येथील राज्यकर्त्यांनी निर्माण करुन ठेवली आहे, असे मेरठ मध्ये होत असलेल्या वीज भारनियमनाच्या मुद्यावर मोदी म्हणाले.