ललित मोदी प्रकरणावरून लोकसभेमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ललित मोदी आणि सुषमा स्वराज यांच्या कुटुंबियांमध्ये व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. विरोधक सभागृहात नसताना सुषमा स्वराज यांनी या प्रकरणी केलेल्या निवेदनावरही त्यांनी आक्षेप घेतला. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब करण्यात आले.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गेल्या आठवड्यात कॉंग्रेसच्या २५ सदस्यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित केले होते. त्यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. सोमवारी कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांचे सदस्य कामकाजात सहभागी झाले होते. प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, सुषमा स्वराज यांनी मानवतेच्या दृष्टिने ललित मोदी यांच्या पत्नीला मदत केल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि ललित मोदी यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी ललित मोदी यांना मदत केली आहे. विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात नसताना या विषयावर सभागृहात निवेदन देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी त्याला जोरदार विरोध केला. त्याला विरोधी पक्षांच्या खासदारांनीही प्रत्युत्तर दिले. या विषयावरून मल्लिकार्जुन खर्गे आणि कॉंग्रेसच्या इतर काही सदस्यांनी स्थगन प्रस्ताव दिले होते. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी ते फेटाळले. यानंतर कॉंग्रेसच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी सुरू केली आणि फलक दाखवण्यास सुरुवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2015 रोजी प्रकाशित
स्वराज कुटुंबीय आणि ललित मोदींमध्ये व्यावसायिक संबंध – मल्लिकार्जुन खर्गे
ललित मोदी प्रकरणावरून लोकसभेमध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
First published on: 10-08-2015 at 11:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha adjourned after uproar by opposition parties over lalit modi issue