मोदींसह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री रिंगणात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान येत्या रविवारी म्हणजे १९ मे रोजी होणार असून त्यासाठी सुरू असलेला प्रचार शुक्रवारी सायंकाळी थंडावला. शेवटच्या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही रविवारी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

पंजाब आणि उत्तर प्रदेश (प्रत्येकी १३), पश्चिम बंगाल (नऊ), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी आठ), हिमाचल प्रदेश (चार), झारखंड (तीन) आणि चंडीगडमधील एका जागेसाठी रविवारी मतदान होणार आहे. पणजी (गोवा) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशावरून प्रचार नियोजित वेळेपेक्षा २० तास अगोदर थांबविण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड-शो दरम्यान कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चकमक होऊन हिंसाचाराचा उद्रेक झाल्याच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने येथील प्रचार गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले, या वेळी अपमानास्पद भाषाही वापरण्यात आली त्यामुळे निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागला.

मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात सुखबीरसिंग बादल, सुनील जाखड, भगवंतसिंग मान, हरसिमरत कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी, बॉलीवूड अभिनेता सनी देओल, मनीष तिवारी, प्रणीत कौर, किरण खेर, पवनकुमार बन्सल, हरमोहन धवन आदी नेते पंजाबमध्ये रिंगणात आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह सनोज सिन्हा, अभिनेते रविकिशन यांच्यासह सपा आणि बसपाच्या आठ नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.