नागपूर : नाना पटोले अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांच्या नावावर भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ात एकतरी विकास काम आहे काय हे त्यांनी दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शहीद चौक, इतवारी येथे भाजपच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. मोदी आणि गडकरी यांच्या कामाचा पाढा वाचतानाच त्यांनी पटोले यांच्यावर टीका केली. नाना पटोले हे एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवतात व विजयी होतात, त्यानंतर काहीतरी कुरापत करतात आणि पक्ष सोडतात. पुन्हा दुसऱ्या पक्षात जातात. तेथे काही काळ राहिल्यावर पुन्हा पक्ष सोडतात. ते भंडारा जिल्ह्य़ात तीनवेळा आमदार होते, तसेच एकदा खासदार होते. या काळात त्यांनी एक तरी प्रकल्प आणला काय. प्रकल्प सोडा, एकतरी  विकास काम त्यांच्या नावावर आहे काय? भंडारा येथून आलेले हे पार्सल तातडीने परत पाठवा, जेणेकरून गडकरी यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढवण्याचे धाडस करू शकणार नाही, असे मुख्यमंत्री  म्हणाले.

नागपूर शहरातून यापूर्वी खासदार झाले आणि मंत्रीही झाले, परंतु त्यांचे दिल्लीत  काही चालत नव्हते. ते दिल्लीत जाऊन मुजरा करीत होते. मोदी यांच्या मंत्रिमंडळात गडकरी सर्वात सक्षम मंत्री आहेत. चार वर्षांपूर्वी मिहान ओसाड पडले होते. आज तेथे ५० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. अनेक उद्योजकांनी येथे गुंतवणूक केली आहे. याशिवाय विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

न्याय ही योजना काल्पनिक आहे. ७२ हजार कोठून देणार हे त्यांना माहिती नाही. एकप्रकारे कोंबडी विकून अंडे घेण्यासारखी ही योजना आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केली.