|| ज्योती सुभाष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या काळात कलावंतांची, सामान्यांचीही जबाबदारी खूप वाढलीय. आपल्याला देशातली आबोहवा कशी पाहिजे, आपली पुढची पिढी कुठल्या वातावरणात वाढवायचीय याचा विचार प्रत्येकानं करावा. शिवाय कुठलाही काळ असो, सत्तेत कुणीही असो, कलावंत कायम व्यवस्थेतल्या दोषांवर बोट ठेवत असतो. ते तर आम्ही करतच राहू. भविष्यात सामान्यांचा विवेक जागा राहावा, ही आशा मी बाळगून आहे. त्यासाठी मी या वेळीचा जनमताचा कौल स्वीकारत भारत देशाला शुभेच्छा देते!

या वेळच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांनी दिलेला निर्णय बघितल्यावर मी पहिल्यांदा विजयी झालेल्यांचं अभिनंदन करते. मागच्या काही दिवसांत काय घडणार आहे याचा साधारण अंदाज आलाच होता. ते घडलं. ते का घडलं याचा विचार होणं गरजेचं आहे आणि समाजमनाला योग्य-अयोग्य गोष्टी कळत असतातच. त्याचं उदाहरण द्यायचं तर इंदिरा गांधींच्या राजवटीतला आणीबाणीचा काळ मी बघितलाय, अनुभवलाय. आपल्या सत्तास्थानाला कुणी, कधीच धक्का लावू शकणार नाही, असा ठाम विश्वास बाळगणारं ते सरकार जनतेनं उलथून लावलं होतंच की! हा आपला इतिहास आहे.

तेव्हापासून आजवर कशीकशी स्थित्यंतरं घडत गेली याकडं डोळसपणे बघितलं पाहिजे. समाजमनात घडलेली ती सगळी स्थित्यंतरं संवेदनशील माणसाला विचार करायला लावणारी आहेत आणि हो, मला या काळाचा विशेष एक जाणवतो, ते म्हणजे तंत्रज्ञान फार निरनिराळ्या पद्धतीनं वापरलं चाललंय. त्यातून एकूणच जगण्याची प्रत बदललीय. आज निरक्षर माणसाच्या हातीही मोबाइल असतो. तो त्याच्या पद्धतीनं मोबाइल, इंटरनेट वापरतो. पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या भाजपानं भारतीय जनतेला कसं ‘कॅप्चर’ करायचं याचं चातुर्य मात्र दाखवलंय, हे नक्की!  लोकांमधलं इतिहास, धर्म यांच्याविषयी असलेलं प्रेम कसं राजकीय फायद्यासाठी वापरून घ्यायचं हे त्यांना नीटच माहितीय. एकूणच भीती, शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. एकदा सत्ता आली की हे लोक काय करू शकतात ते आपण गेल्या पाच वर्षांत पाहिलंय. तरीही त्यांना यश मिळालंय. त्यांच्याकडे ध्येयाने प्रेरित होऊन कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांनी त्यांची रणनीती चाणाक्षपणे वापरलीय. आपल्या समाजाची बलस्थानं, कच्चे दुवे त्यांना माहीत आहेत. या वेळी निवडणूककाळात दिसलं की, कुठलंही क्षेत्र भाजपनं प्रचार-प्रसारासाठी सोडलं नाही. अगदी मालिकांमधूनही भाजपच्या योजनांचा छुपा प्रचार-प्रसार केला गेला. जनमताचा कौल बघून मात्र मला जनतेला भावनिक-बौद्धिक मांद्य आलंय का, अशी शंका येते.

सध्याच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी केलेल्या चुका या खरोखर चुका वाटतात का, माहीत नाही. भविष्यात ते सत्ता कशी हाताळतील, ते सांगता येत नाही. संवेदनशीलतेचा, स्वातंत्र्याचा आदर आता किती राहील यांची शंका वाटते. कारण भाजपनं त्यांचे अजेंडे कायमच निर्ममपणे राबवलेत. त्यांनी सांस्कृतिक अवकाशाचासुद्धा संकोच केला. त्यांच्या माध्यमातून शिक्षणपद्धतीतही प्रदूषित विचार आणला गेला. माणसाची मनं जिथं घडतात तिथंच आक्रमण होणार असेल तर पुढच्या पिढीला किती लढा द्यावा लागेल याची चिंता वाटते. कलेच्या अवकाशावरही आक्रमण होतं आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला एक प्रकारचं धास्तावलेपण नक्कीच वाटू शकतं. मुंबईत अनेक कलावंत-साहित्यिकांनी एकत्र येत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा उंचावला. नयनतारा सहगलसुद्धा तिथे उपस्थित होत्या. अशा कृतींचा मला कलावंत म्हणून अभिमान वाटतो.

मात्र हेही वास्तव आहेच, की सरकार म्हणून कितीही चुकीची माणसं सत्तेत आली तरी त्यांना सामना जिवंत माणसांचाच करायचा असतो. या माणसांशी संवाद ठेवणं, त्यांना योग्य दिशा दाखवत जाणं हे आता केलं गेलं पाहिजे. कारण लोकशाहीत सामान्य माणूस हा सर्वोच्च स्थानी असतो. लोकशाहीत त्याच्या अभिव्यक्तीचा संकोच करण्याचा अधिकार कुणालाच नाही. दीर्घकाळ सत्ता भोगल्यानं काँग्रेसला मरगळ आली होती. येत्या काळात काँग्रेस खडबडून जागी होईल. काँग्रेसचा तरुण चेहरा म्हणून समोर येणाऱ्या राहुल गांधींकडे सद्भावना खूप आहे. मात्र केवळ सद्भावना निवडणूक जिंकायला पुरेशी नसते. शक्ती आणि सत्ता, ती हस्तगत करण्याचं तंत्र, हे वेगळंच शास्त्र आहे. शिवाय तुमची योग्यता वाढवायला तुम्हाला खूप वेळ देऊन कष्ट घ्यावे लागतात. राहुल गांधींना त्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असं दिसतं.

सध्याचा राष्ट्रवाद नकारात्मक आहे. तो मोडून काढत त्या जागी विधायक राष्ट्रवाद रुजवण्यासाठी आधी आपण आपल्या माणूस असण्याचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. आपल्यात वेगवेगळ्या ऊर्जा असतात. त्यात सकारात्मकसह नकारात्मक ऊर्जाही असतात. त्या हाताळता आल्या पाहिजेत. स्वत:ला ‘कोहम’ असा प्रश्न विचारणं हे हिंदू तत्त्वज्ञान आहे. अशा प्रकारचं तत्त्वज्ञान वापरत माणूसपणाचा पाया दृढ करणारे दृष्टिकोन रुजवावे लागतील.

सत्ता हस्तगत करण्यासाठी अनेकदा लोकांच्या मना-मेंदूची वाढ खुंटवली जाते. सामान्यांना तिथं स्वत:चा विचार-विवेक मिळणं ही प्रक्रिया हळूहळू होत असते. त्यासाठी लहान-लहान कृती कार्यक्रम महत्त्वाचे ठरतील असं वाटतं. हे कार्यक्रम आक्रमक, प्रतिक्रियावादी नसून संवादी असले पाहिजेत. त्यातून लोकशाहीवादी विचारांशी नावे, अधिकाधिक माणसं जोडली गेली पाहिजेत. कारण आक्रमकत्यातून केवळ संघर्ष तयार होतो. एकमेकांना समजून घेऊन, मत्रीपूर्ण वातावरणात कलामाध्यमातून लोकशाही पेरली जात राहिली पाहिजे. सत्तेवर कुणीही येवो, सत्ता नीट राबवली गेली पाहिजे यासाठी जनतेचा दबावगट वाढवणं कायम महत्त्वाचं असतं. राष्ट्र सेवा दलानं कलापथकासारखे चांगले प्रयोग केले. ते सगळं नव्या पिढीनं पुढं नेलं पाहिजे. प्रत्येकानं आपापली माध्यमं लोकशाहीसाठी वापरली पाहिजेत. निर्भय बनण्याची गरज आहे. काळ कठीण आहे. लोकशाहीचा चेहरा वाचवायचा आहे. जुनी पिढी आता काय फार हस्तक्षेप करू शकणार नाही. मात्र नवी पिढी यथावकाश का होईना सामाजिक-राजकीय घटितांकडे लॉजिकली बघू शकेल. येणाऱ्या पिढीकडे विचार, जागरूकता असेल हा विश्वास वाटतो.

(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत)

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2019 results analysis jyoti subhash
First published on: 23-05-2019 at 23:18 IST