भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन कर्करोगाने झालं. सुषमा स्वराज या त्यांच्या अमोघ वक्तृत्वासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांची अभ्यासपूर्ण शैली आणि तडाखेबंद भाषण यामुळे त्या कायमच चर्चेत राहिल्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्या केंद्रीय मंत्रीही होत्या. आता त्यांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना उमेदवारी दिली आहे. आपण जाणून घेऊ बांसुरी स्वराज यांच्याविषयी.

बांसुरी स्वराज यांनी मानले मोदींचे आभार

भाजपाने आज लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये बांसुरी स्वराज यांचं नाव आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर बांसुरी स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत.

कोण आहेत बांसुरी स्वराज?

बांसुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली बार कौन्सिलमध्ये त्यांनी २००७ मध्ये प्रवेश घेतला. दिल्लीत त्या मागच्या १६ वर्षांपासून वकिली करत आहेत. त्यांनी साहित्य हा विषय घेऊन वॉरवरिक विद्यापीठातून बी ए ऑनर्सचा कोर्स केला आहे. तसंच त्यांनी लंडन येथील बीपीपी लॉ स्कूलमधून वकिलीचं शिक्षण घेतलं तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलं आहे.

भाजपाचे दिल्लीचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांना जेव्हा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हा बांसुरी स्वराज यांना भाजपाच्या कायदा विभागाच्या सहसंयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली. आता त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांसुरी स्वराज कधी चर्चेत आल्या होत्या?

बांसुरी यांनी कायद्यात बॅरिस्टर म्हणूनही पदवी मिळवली आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या कायदेशीर संघाशी संबंधित असल्याबद्दल त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी बासुरी स्वराज चर्चेत आल्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या मुलीचा स्वतःचा व्यवसाय आहे, असे भाजपने तेव्हा आपल्या बचावात म्हटले होते. त्या सुषमा स्वराज यांच्या कन्या असल्या तरीही बांसुरी यांना त्यांचे काम आणि कार्यक्षेत्र निवडण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य असल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला होता. आता याच बांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.