देशात आज दुसऱ्या टप्प्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१.१२ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी आज मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार होते. २० हजार ७१६ मतदान केंद्रे होती. राज्यात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान झाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.

  • महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी
    बुलडाणा ५७.०९ टक्के, अकोला ५४.४५ टक्के, अमरावती ५५.४३ टक्के, हिंगोली ६०.६९ टक्के, नांदेड ६०.८८ टक्के, परभणी ५८.५० टक्के, बीड ५८.४४ टक्के, उस्मानाबाद ५७.०४ टक्के, लातूर ५७.९४ टक्के आणि सोलापूर ‎५१.९८ टक्के.
  • देशात इथे झाले मतदान

तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान झाले. ओदिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही आज मतदान झाले.

Live Blog

18:16 (IST)18 Apr 2019
दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण देशात एकूण ६१.१२ टक्के मतदान
16:40 (IST)18 Apr 2019
महाराष्ट्रातील दहा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४६ टक्के मतदान

बुलडाणा ४५.९४ टक्के, अकोला ४५.३९ टक्के, अमरावती ४५.६३ टक्के, हिंगोली ४९.१३ टक्के, नांदेड ५०.०४ टक्के, परभणी ४८.४५ टक्के, बीड ४६.२९ टक्के, उस्मानाबाद ४६.१३ टक्के, लातूर ४८.१० टक्के आणि सोलापूर ४१.४७ टक्के.

16:02 (IST)18 Apr 2019
जम्मू-काश्मीरमध्ये ३८ टक्के मतदान

जम्मू-काश्मीरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ३८.५ टक्के मतदान झाले. श्रीनगरमध्ये ५.७ टक्के मतदान झाले आहे

15:59 (IST)18 Apr 2019
रांगेत उभ्या असलेल्या मतदाराचा मृत्यू

ओदिशाच्या गंजममध्ये मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या ९५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जागेवर कोसळल्यानंतर या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

14:43 (IST)18 Apr 2019
हाणामारीमध्ये ईव्हीएमची तोडफोड

पश्चिम बंगालच्या चोप्रामध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली.

14:25 (IST)18 Apr 2019
राज्यातल्या दहा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३५.४० टक्के मतदान

बुलडाण्यात ३४.४३ टक्के मतदान, अमरावती ३६.६८ टक्के मतदान, बीडमध्ये ३४.६५ टक्के मतदान, नांदेडमध्ये ३८.१९ टक्के मतदान, लातूरमध्ये ३६.८२ टक्के मतदान,  सोलापूरमध्ये ३१.५६ टक्के मतदान, हिंगोलीत ३७.४४ टक्के मतदान, उस्मानाबाद ३४.९४ टक्के मतदान,  परभणीत ३७.९५ टक्के मतदान

12:58 (IST)18 Apr 2019
बुरखा घालून पुरुषांनी बोगस मतदान केल्याचा आरोप

उत्तर प्रदेशमधील अमरोहात बोगस मतदानाचा आरोप, भाजपा उमेदवाराने केला आरोप, बुरखा घालून पुरुषही मतदान केंद्रावर आल्याचा दावा, बुरखाधारी महिलांची मतदान केंद्रावर तपासणी करण्याची मागणी

12:51 (IST)18 Apr 2019
बापकळ गावाचा मतदानावर बहिष्कार

परभणी लोकसभा मतदारसंघातील बापकळ या गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.  लघुसिंचन प्रकल्प आणि अन्य विकासकामे रखडल्याने ग्रामस्थ आक्रमक

12:14 (IST)18 Apr 2019
राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत झालेले मतदान

सोलापूर - १६. ४८ टक्के, बीड - १८.३९ टक्के, हिंगोली - २०.४० टक्के, बुलढाणा - २०.५२ टक्के, परभणी - २०.६२ टक्के, नांदेड - २४.०६ टक्के, अकोला - १६.९५ टक्के, लातूर -१९.९७ टक्के

12:09 (IST)18 Apr 2019
"वंचित आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबलं तरी कमळालाच मतदान"

सोलापूरमध्ये वंचित आघाडीच्या चिन्हासमोर बटण दाबलं तरी कमळालाच मतदान होत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात यांनी केला आहे. 

11:28 (IST)18 Apr 2019
राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत झालेले मतदान

बुलढाणा - ७.७०% , अकोला - ७.६०%, अमरावती - ६.४०%, हिंगोली - ७.९४%, नांदेड - ८.८८%, परभणी - ९.३०%, बीड - ७.५५%, उस्मानाबाद - ७.९०%, लातूर - ८.४१%, सोलापूर - ६. ८७ %

11:25 (IST)18 Apr 2019
लातूरमधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

लातूरमध्ये पीकविमाच्या मुद्द्यावरुन आनंदवाडी येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, सकाळी सव्वा दहावाजेपर्यंत एकही मतदान नाही.

10:42 (IST)18 Apr 2019
लातूरमध्ये १०५ वर्षांच्या आजींनी केले मतदान

लातूरमध्ये राहणाऱ्या १०५ वर्षांच्या कवीबाई कांबळे यांनी कुटुंबासह मतदान केले. हरंगूळ बुद्रूक येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.

09:45 (IST)18 Apr 2019
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेले मतदान

आसाम (५ जागा) - ९. ५१ टक्के, जम्मू- काश्मीर (२ जागा)- ०.९९ टक्के, कर्नाटक (१४ जागा)- १. १४ टक्के, मणिपूर (१ जागा) - १.७८ टक्के, ओदिशा (५ जागा)- २. १५ टक्के, तामिळनाडू (३८ जागा)- ०. ८१ टक्के, त्रिपुरा ( १ जागा) - ०. ०० टक्के, उत्तर प्रदेश (८ जागा) - ३. ९९ टक्के, पश्चिम बंगाल ( ३ जागा) - ०. ५५ टक्के, छत्तीसगड (३ जागा) - ७. ७५ टक्के, पुद्दूचेरी - १. ६२ टक्के

09:41 (IST)18 Apr 2019
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि त्यांच्या पत्नीने बजावला मतदानाचा हक्क
09:02 (IST)18 Apr 2019
कमल हसन आणि त्यांची मुलगी श्रुती हसन यांनी रांगेत उभे राहून केले मतदान

कमल हसन आणि त्यांची कन्या श्रुती हसन यांनी तामिळनाडूतील चेन्नई येथे मतदानाचा हक्क बजावला. दोघांनी रांगेत उभे राहून मतदान केले.

08:52 (IST)18 Apr 2019
बीडमध्ये पाच ठिकाणी ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड

बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, केज, अष्टी आणि परळी या चार ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आली होती. तक्रार येताच आम्ही तिथे नवीन मतदान यंत्र पाठवले असून आता सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरु आहे: जिल्हाधिकारी

08:49 (IST)18 Apr 2019
बुलढाण्यातील त्या तीन केंद्रावरील मतदान सुरू

चिखली तालुक्यातील ३ ठिकणी मशीन बंद पडल्याने मतदान २० मिनिटे उशिरा सुरु झाले. सोनेवाडी, चिखली शहर आणि सवणा येथील मशीन बंद पडली होती.

08:24 (IST)18 Apr 2019
संरक्षणमंत्री सीतारमन यांनी बजावला मतदानाचा हक्क

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी बेंगळुरुत बजावला मतदानाचा हक्क

08:13 (IST)18 Apr 2019
बीड आणि लातूरमधील ईव्हीएममध्ये बिघाड

बीडमधील मोहखेडमध्ये ईव्हीएम बिघडल्याने अद्याप मतदानाला सुरुवात झालेली नाही, लातूरमधील एका मतदार केंद्रावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त

07:56 (IST)18 Apr 2019
आसाममध्ये व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड

आसाममधील सिलचर येथे व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड, मतदान प्रक्रिया खोळंबली

07:45 (IST)18 Apr 2019
सुशीलकुमार शिंदे यांनी केले मतदान

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये मतदान केले. सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात भाजपा आणि वंचित आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

07:44 (IST)18 Apr 2019
रजनीकांत यांनी केले मतदान

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईत मतदान केले.

07:43 (IST)18 Apr 2019
पी. चिदंबरम यांनी केले मतदान

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी तामिळनाडूतील शिवगंगा येथे मतदान केले.

07:41 (IST)18 Apr 2019
अकोला मतदारसंघात भाजपाला मतविभाजनाचा फायदा होणार का?

07:39 (IST)18 Apr 2019
विश्लेषण: अमरावती मतदारसंघात नवनीत राणा शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावणार का ?

दुसऱ्या टप्प्यात ९५ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडे सध्या २७ जागा असून, या जागा कायम राखण्याचे आव्हान आहे. राज्यातील दहापैकी आठ जागा युती तर दोन जागा आघाडीकडे आहेत.