राममंदिराच्या उभारणीला गती मिळाली नाही तर मी पुन्हा अयोध्येत जाईन, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सेना-भाजपा युती, राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी राम मंदिराच्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एक गोष्ट तर तुम्हाला मानावीच लागेल की, शिवसेना अयोध्येत गेल्यानंतर थंड बस्त्यात पडलेला राममंदिराचा मुद्दा हलायला लागला. त्याच्यावर पुन्हा देशभर एक वादळ निर्माण व्हायला लागलं. कोर्टालासुद्धा काही निर्णय, किंबहुना काही पावले उचलावी लागली. त्यानंतर एक मोठा निर्णय याबाबतीत झाला की, ती विवादास्पद जमीन सोडून बाकीची जमीन पुन्हा त्या ट्रस्टकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राम मंदिराच्या जागेसाठी ६५ एकर जमीनीच्या मुद्दयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ! 65 एकर… तो एक निर्णय झालेला आहे. जो अगदीच निपचित पडलेला विषय होता तो बराच पुढे गेलेला आहे. आता कोर्टानेसुद्धा मध्यस्थ नेमलेले आहेत. म्हणजे निदान एक हालचाल, सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं की, कोर्टाने मध्यस्थ नेमल्यानंतर त्यांनी आणखी एक गोष्ट कृपाकरून करायला पाहिजे की, या सगळ्याला कालमर्यादा घातली पाहिजे की, एवढय़ा मर्यादेत ते संपवा. नाही तर आम्हाला निर्णय द्यावा लागेल. तर आणि तरच हा विषय सुटेल आणि तिथे गेल्यानंतर एकूणच वातावरण मी बघितलंय सगळं. जनतेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दल प्रचंड आस्था आहे, ती संपूर्ण देशात आहे. आणि मंदिर व्हावं ही संपूर्ण देशाची इच्छा आहे.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना, ‘काँग्रेसमुक्त भारत झाल्यास या देशातील सगळे प्रश्न संपतील असं आपल्याला वाटतं का?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भूमिकेला आपला विरोध असल्याचे उद्धव यांनी सांगितले. ‘काँग्रेसमुक्त देश किंवा काँग्रेस नष्ट करा असं मी कधीच बोललो नाही. मुळात विरोधी पक्ष असायलाच हवा,’ असं उद्धव यांनी सांगितले. याच संदर्भात बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विरोधीपक्षाबद्दल दिलेला सल्लाही उद्धव यांनी सांगितला. ‘मुख्यमंत्र्यावर तर जबाबदारी असतेच पण विरोधी पक्षनेत्यावर त्याहून मोठी जबाबदारी असते. मुळात विरोध करणं म्हणजे आकांडतांडव करणे असं नाही. विरोधी पक्षनेत्यासुद्धा जबाबदारी असते. जनतेला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्याला जास्त पार पाडावी लागते,’ असं एकादा विरोधीपक्षाबद्दल बोलताना शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलं होतं अशी आठवण उद्धव यांनी या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली.