देशभरामध्ये भाजपा आणि मित्रपक्षांची हवा असतानाचा शिरुर मतदारसंघात मात्र शिवसेना- भाजपा युतीला धक्का देणारा निकाल लागला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला आहे. कोल्हे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना खासदारकीसाठी तिकीट जाहीर झाले. अगदी प्रचाराच्या दिवसांपासून अमोल कोल्हे यांनी आढळरावांना कडवं आव्हान दिलं होतं. मतमोजणीच्या दिवशीही त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती आणि प्रत्येक टप्प्यामध्ये ही आघाडी वाढत गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरुर मतदारसंघातील एकूण १२ लाख ८६ हजार २२६ मतांपैकी अमोल कोल्हे यांना ४९.१७ टक्के मते मिळाली. २३ उमेदवार उभे असणाऱ्या या मतदारसंघातील जवळजवळ ५० टक्के म्हणजेच ६ लाख ३२ हजार ४४२ मते मिळाली. कोल्हे यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या अढळराव पाटील यांना ४४.६४ टक्के म्हणजेच ५ लाख ७४ हजार १६४ मते मिळाली. कोल्हे यांनी ५८ हजार २७८ मतांनी अढळराव यांचा पराभव केला.

निर्णयाक आघाडीनंतर प्रतिक्रिया देताना कोल्हे यांनी हा मतदार राजाचा विजय असल्याचे सांगितले. या विजयाचे श्रेय कोल्हे यांनी शरद पवार, दिलीप वळसे-पाटील, अजीत पवार यांना देत त्यांचे आभार मानले.

शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगली पकड असूनही कोल्हे यांनी  ५० हजारहून अधिकच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. अमोल कोल्हे यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर मोठा प्रभाव आहे त्यामुळे शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता असल्यानेच राष्ट्रवादीने कोल्हे यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात होते. याच खेळाची फायदा राष्ट्रवादीला मिळाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election result 2019 ncps amol kolhe beats shivajirav adhalrav patil in shirur
First published on: 23-05-2019 at 17:02 IST