लोकसभेत साध्वी प्रज्ञा यांच्या शपथेवरुन वाद, विरोधकांचा जोरदार गोंधळ

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली

भोपाळमधून भाजपाच्या खासदार असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज खासदारकीची शपथ घेतली. मात्र यावेळी विरोधकांचा जोरदार गोंधळ पहायला मिळाला. साध्वी प्रज्ञा सिंह शपथ घेण्यासाठी दाखल होताच, विरोधकांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रज्ञा सिंह ठाकूर संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. मात्र त्यांनी आपल्या नावाचा उच्चार करताच विरोधकांनी विरोध करत फक्त आपल्या नावाचा उल्लेख व्हावा अशी मागणी केली.

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी संस्कृतमध्ये सुरुवात करताना म्हटलं की, ‘मैं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी लोकसभा सदस्य के रूप में…”. साध्वी प्रज्ञा सिंह शपथ घेत असतानाच काही खासदारांनी त्यांना थांबवण्यास सुरुवात केली. यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर थांबल्या.

लोकसभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सांगितलं की, तुम्ही तुमच्या वडिलांचं नावदेखील घेतलं पाहिजे. यादरम्यान विरोधक गोंधळ करत होते. यावेळी हंगामी अध्यक्ष डॉ विरेंद्र कुमार यांनी आपण रेकॉर्ड तपासत आहोत, तुम्ही शांतता राखा असं आवाहन केलं. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी दुसऱ्यांदा पुन्हा शपथ घेण्यास सुरुवात करताच पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर पुन्हा साध्वी प्रज्ञा थांबल्या.

यानंतर लोकसभेतील अधिकाऱ्यांनी खासदारांची माहिती असणारी एक फाईल हंगामी अध्यक्ष डॉ विरेंद्र कुमार यांच्यासमोर सादर केली. हंगामी अध्यक्षांनी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिला. हंगामी अध्यक्षांनी साध्वी प्रज्ञा यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं विजयी प्रमाणपत्रही मागवलं. यादरम्यान ते गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना शांत करत होते. अखेर तिसऱ्या वेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पूर्ण शपथ घेतली.

महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींना अमेठीतून हरवून संसदेत पोहोचलेल्या स्मृती इराणी खासदारकीची शपथ घेताना सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवून जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील बराच वेळ बाक वाजवत अभिनंदन करत होते. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हे पहिलंच अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३०३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपा सहीत घटकपक्षांना म्हणजेच एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या वेळी सगळ्याच सदस्यांनी शपथ घेतली.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksabha mp bhopal sadhvi pragnya sanskrit oath controversy sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या