* गिरीश कुबेर 

* राजीव खांडेकर

निवडणुका या लोकशाहीचा वसंतोत्सव यावर आता कोणाचं दुमत नाही. उत्सवात एक भावनोत्कटता असते. सांस्कृतिक उत्सवाला ती असण्यात कोणाची काही हरकत असणार नाही. पण निवडणुकीच्या उत्सवाला ती तशी असावी का? एरवी उत्सवाच्या फलश्रुतीचं मोजमाप कधी केलं जात नाही. तसं ते करायचंही नसतं. कारण आनंदाखेरीज त्यातून काही मिळवायचं नसतं.

पण निवडणुकांचं तसं नाही. त्यावर एका पिढीचं भवितव्य अवलंबून असतं. निवडणुका लोकसभेच्या असतील तर त्यांचं महत्त्व अधिकच. देश कोणत्या दिशेनं जाणार? मुळात त्याच्या प्रवासाची दिशा काय असावी? ती ठरवण्याचा अधिकार कोणाकडं असावा? तसा अधिकार असणाऱ्यांचा अधिकार आणि समज किती? आहे ती दिशा योग्य की अयोग्य? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या निवडणुकांतून मिळतात. किंवा ती शोधायची असतात.

आणि प्रश्न आले की नुसतं भावनाशरण होऊन चालत नाही. किंबहुना भावनेचा आधार जितका कमी तितका उत्सवाचा आनंद मोठा. तेव्हा निवडणुकांतून उत्तरं शोधायची तर त्यासाठी विचार हवा. तर या निवडणुकांत असा कोणता विचार आहे हे शोधायचा प्रयत्न म्हणजे लोकसत्ता – एबीपी माझा यांचा हा संयुक्त उपक्रम.

निवडणुकीची विचारसंहिता

त्यात पहिल्या टप्प्यात शोध घ्यायचाय काय आहे महाराष्ट्राच्या मनात या प्रश्नाचा. त्याची सुरुवात अर्थातच झाली विदर्भापासून.

त्यामागचं पहिलं कारण आहे मतदानाचं वेळापत्रक. विदर्भातल्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे ११ एप्रिलला. म्हणून या शोधयात्रेचा शुभारंभ झाला विदर्भाचं केंद्र असलेल्या नागपूरपासून. हे झालं साधंसोपं सरळ कारण. पण निवडणुका आल्या की साधंसोपं सरळ असं काहीच नसतं. नागपूरच्या निवडीमागेही तसं ते नाही. अनेक कंगोरे आहेत नागपूर आणि विदर्भाच्या निवडीमागे.

पहिलं म्हणजे देशातल्या दोन विचारधारांचं ते उगम केंद्र आहे. इतिहासात डोकावलं तर दिसेल की या विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात बंगालची फाळणी झाली आणि त्यापाठोपाठ अस्तित्वात आली मुस्लीम लीग. काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांवर मुस्लीम धार्जणिेपणाचे आरोप होऊ लागले. परिणामी काँग्रेसमधला हिंदुत्ववादी विचारांचा गट अस्वस्थ होऊ लागला. त्याआधी वास्तविक हिंदू महासभेची स्थापना झालेली होती. पण त्याने समाधान होईना. म्हणून मग काँग्रेसमधल्या हिंदूंनी स्वतंत्रपणे संघटनेची स्थापना केली. त्यासाठी पुढाकार घेतला केशव बळीराम हेडगेवार यांनी. त्यातून नागपुरात १९२५ सालच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आज संघ देशाच्या राजकीय अभिसरणाचा केंद्रिबदू आहे. या केंद्रिबदूचं केंद्र आहे नागपूर. म्हणूनही नागपूर महत्त्वाचं.

संघाच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा हुंकार देशात घुमू लागला त्याला छेद देण्याचा पहिला बुद्धिवादी आणि तरीही धार्मिक असा प्रयत्न केला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. हिंदूंचं संघटन वगरे ठीक. पण त्यातील जातिव्यवस्थेचे काय हा त्यांचा समस्त हिंदुत्ववाद्यांना प्रश्न होता. त्याचं उत्तर त्यावेळी विरोधकांकडे नव्हतं आणि आजही ते तसं आहे, असं मानण्याजोगी परिस्थिती नाही. पण डॉ. आंबेडकर परिस्थितीशरण जाणाऱ्यांतले नव्हते. त्यांनी ती बदलली. आणि हिंदू धर्मविचारांस आव्हान देत स्वतच त्या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ती जागा देखील नागपूरच. परत डॉ. बाबासाहेबांनी निवडणूक आखाडय़ात उडी घेतली ती देखील विदर्भातल्या भंडारा मतदारसंघातून. हे देखील एक कारण. हा झाला इतिहास.

वर्तमानाचा विचार केल्यास या निवडणुकीतल्या दोन मुद्दय़ांचा थेट संदर्भ नागपूर अणि विदर्भाशी दिसतो. एक म्हणजे राफेल हे विमान. त्याचा वाद बराच गाजला आणि सर्वोच्च न्यायालयाचा त्याबाबतचा निकाल राखून ठेवला गेलेला असल्यानं तो मिटलाय असं म्हणता येणार नाही. हे विमान जी कंपनी बनवणार आहे त्या दसॉ कंपनीचा अनिल अंबानी यांच्या सहयोगातला कारखाना उभा राहतोय तो नागपुरातच. तो कारखाना आणि आजूबाजूची परिस्थिती पाहणं आलं.

शेतकरी आणि ग्रामीण जगण्यातल्या आíथक ताणतणावाचं प्रतिबिंब महाराष्ट्रात विदर्भात अधिक दिसतं. देशातलं शेतकरी आत्महत्यांचं केंद्र हे विदर्भ राहिलंय. गेल्या पाच वर्षांत चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या काळात जे घडलं तेच आताही घडतंय. ते समजून घेणं आवश्यक होतं. म्हणूनही विदर्भात अंदाज घेणं महत्त्वाचंच होतं.

आणि या सगळ्या पलीकडचा मुद्दा म्हणजे नितीन गडकरी. भाजपला बहुमतापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या आणि सहमतीनं उमेदवार निवडायची वेळ आली तर पंतप्रधानपदाची माळ नितीनभौंच्या गळ्यात पडेल अशी एक भूमका मध्यंतरी उठली होती. अशा वदंता सुखासुखी, आपोआप पसरत नाहीत. त्यामागे निश्चित एक कारस्थान असतं. या प्रकरणात त्यामागे कोण, का आहे याची चर्चा करण्याचं हे स्थळ नाही आणि ते प्रयोजनही नाही. पण त्या भूमकेतल्या चेहेऱ्याचं काय चाललंय हे पाहणं आवश्यक होतं. म्हणूनही नागपूरला येणं आलंच.

तेव्हा या शोधयात्रेसाठी मी आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर विदर्भाच्या फुफाटय़ात निवडणुकीच्या आगीचा वेध घेण्यासाठी उतरलो. तापमानकातला पारा ४२ सेल्शियसची उंची कधीच पार पाडून गेलेला. जमीन शब्दश आग ओकत होती. एरवी उन्हात आकाशाकडे पाहिलं की डोळ्याची आग होते. विदर्भात ती जमिनीकडे पाहिलं तरी होते. दशदिशांनी कोणी जणू गरम वाऱ्याचे झोतच्या झोत वातावरणात फुंकत होतं. माणसं डोक्याला मुंडासं बांधून हिंडणारी. सूर्य दिसेनासा झाला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेपर्यंत आपल्या उपस्थितीच्या जहालखुणा वातावरणात ठेवून जात होता. सगळ्या निसर्गानंच जणू दग्धभू धोरणाचा स्वीकार केलाय असं वाटावं अशी स्थिती.

आणि अशा सर्वार्थाने तापलेल्या वातावरणात आम्ही दोघे आणि इथले सहकारी देवेंद्र गावंडे, सरिता कौशिक, आमची सूत्रं हलवणारा संदीप रामदासी या अज्ञाताच्या शोधात रणमदानात. त्या प्रवासाच्या या नोंदी. बडय़ा राजकारण्याशी, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवेशी, दोन-अडीच एकरात सोयाबीन पिकवणाऱ्याशी, उद्योजकांशी, पानवाल्याशी आणि इतकंच काय ते निवडणुकाच नको म्हणून एकेकाळी हिंसाचार घडवलेल्या नक्षलवाद्यांशी.. झालेल्या या गप्पांतील निरीक्षणं..

आजपासून क्रमश :

girish.kuber@expressindia.com

rajivk@abpnews.in