Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अलिगडमधील एका महिलेने तिच्या मुलीच्या पतीबरोबर म्हणजे जावयाबरोबर पळून गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आता पुन्हा एक अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूंममध्ये चार मुलांची आई तिच्याच मुलीच्या सासऱ्याबरोबर पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
एक महिला तिच्या मुलीच्या सासऱ्याच्या प्रेमात पडली. शैलेंद्र उर्फ बिल्लू असं सासऱ्याचं नाव आहे, तर त्या महिलेला चार मुले असून सध्या त्या महिलेचा पती तिचा शोध घेत आहे. प्रेमाची ही आगळी वेगळी कहाणी दातागंज पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. ममता म्हणून तिला ओळखलं जायचं. मात्र, ती तिच्या मुलीच्या सासऱ्याबरोबर पळून गेल्याचा आरोप आता तिच्या पतीने केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात तिच्या पतीने पोलीस तक्रार देखील दाखल केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
महिलेचा पती सुनीलने म्हटलं आहे की, कामाच्या निमित्ताने मी बाहेरगावी असायचो. महिन्यातून एकदा, दोनदा घरी येत असे. पण माझ्या अनुपस्थितीत पत्नी ममता आपल्या मुलीच्या सासऱ्यांना घरी बोलावत असायची, असा आरोप पतीने केला आहे. ४३ वर्षीय ममताला चार मुले आहेत. त्यापैकी एकाचं २०२२ मध्ये लग्न झालेलं आहे. माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या महिलेचे तिच्या मुलीच्या ४६ वर्षीय सासऱ्याशी प्रेमसंबंध होते.
उत्तर प्रदेश में भागम भाग चालू आहे
— Jitendra Verma (@jeetusp) April 19, 2025
अलीगढ़ में सास दामाद के बाद बदायूं में समधन समधी के साथ फरार.. pic.twitter.com/7dqr3CPYEm
या महिलेचा पती सुनील कुमार हा ट्रक ड्रायव्हर आहे. या घटनेबाबत सुनीलने म्हटलं की, तो ट्रकवर असायचा, पण तरीही आपण नियमितपणे घरी पैसे पाठवत होतो. पण पत्नी ममता अनेकदा मुलीच्या सासऱ्याला घरी बोलावत असे. मी ट्रक चालवतो असलो तरी मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा घरी येत असे आणि घरी वेळेवर पैसे देत होतो. पण आता पत्नी मुलीच्या सासऱ्याबरोबर दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली आहे, असा आरोप पती सुनीलने केला आहे.
दरम्यान, या महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या काही व्यक्तींनी या घटनेबाबत सांगताना म्हटलं की, पती सुनील हा कामानिमित्त बाहेरगावी असायचा. त्याच्या अनुपस्थितीत ममता अनेकदा मुलीच्या सासऱ्याला फोन करायची. तो नातेवाईक असल्याने कोणालाही काहीही संशय येत नव्हता. मात्र, यानंतर हा प्रकार समोर आला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पती सुनील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलीच्या सासऱ्याच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात योग्य तो तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.