देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांनी एका वकिलाला त्याच्या मोठ्या बोलण्यावरुन चांगलंच फटकारलं आहे. तावातावाने हा वकील बोलत होता, त्याचे हावभाव आणि चढा आवाज यावर सरन्यायाधीश संतापले आणि त्यांनी कडक शब्दांत त्या वकिलाला इशारा दिला.

नेमकं काय घडलं?

न्यायालयात सुरु असलेल्या चर्चेदरम्यान डी. वाय. चंद्रचूड यांनी एका वकिलाला बोलताना रोखलं. त्यानंतर ते म्हणाले जे काही म्हणणं मांडायचं आहे ते ओरडून आणि तावातावाने मांडू नका, तुमचा आवाज कमी ठेवा. तुम्ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहात. तुमचा आवाज सौम्य ठेवा. तावातावाने बोलणं थांबवलं नाहीत तर तुम्हाला मी कोर्टातून काढून टाकेन. असा इशाराच चंद्रचूड यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वकिलाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न

यानंतर त्यांनी वकिलाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले. तुम्ही कुठे असता?, प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने तुम्ही न्यायाधीशांवर ओरडता का? न्यायालयात बोलत असताना चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे. ओरडून, तावातावाने बोलून काय होणार? आवाज कमी करा. तुम्हाला जर असं वाटत असेल की आवाज चढवल्याने तुम्ही माझ्यावर प्रभाव पाडू शकता तर ती तुमची चूक आहे. मागच्या २३ वर्षांमध्ये असं कधी घडलं नाही आणि माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षातही असं मुळीच होणार नाही. असा इशारा सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी दिल्यानंतर वकिलाने तातडीने माफी मागितली आणि सौम्य आवाजात बोलण्यास सुरुवात केली.