तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अकबर नायजेरियात असताना भारतात मी टूचं वादळ घोंघावलं. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता प्रकरणापासून सुरू झालेलं हे वादळ हा हा  म्हणता सगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलं. एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप झाले. प्रिया रमाणी या पत्रकारानं धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला. मात्र, रमाणी यांच्या मागे तब्बल १९ महिला उभ्या राहिल्या आणि त्यांनी अकबर यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्धार केला. याच दरम्यान, मोदी सरकारनं अशा लैंगिक छळ करणाऱ्या अतिरेक्यांना पाठिशी का घालावं असा सवाल करत काँग्रेससह विरोधकांनी भाजपाची कोंडी केली. परिणामी आधी ताठ भूमिका घेणाऱ्या अकबरना राजीनामा देणे भाग पडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्यावरील आरोपांविरोधात मी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आता परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून मला देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांचा आभारी आहे, असे अकबर यांनी म्हटले आहे.

काय म्हटले होते प्रिया रमाणींनी

प्रिया रमाणी या महिला पत्रकाराने सर्वात आधी एम.जे.अकबर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. ऑक्टोंबर २०१७ मध्ये वोग इंडियामध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी एम.जे.अकबर यांच्यासोबतच्या भेटीचा अनुभव सांगितला. त्यावेळी मी २३ वर्षांची तर अकबर ४३ वर्षांचे होते. दक्षिण मुंबईतील एक पॉश हॉटेलमध्ये अकबर यांनी मुलाखतीसाठी बोलावले होते. ती नोकरीसाठी मुलाखत कमी आणि डेट जास्त होती. त्यावेळी एम.जे. अकबर यांनी आपल्याला दारु पिण्याची ऑफर दिली त्यावेळी ते जुनी हिंदी गाणी गुणगुणत होते. त्यांनी मला बेडवर बसण्यास सांगितले पण मी नकार दिला. रमाणी यांनी सोमवारी यासंबंधी टि्वट करुन एम.जे. अकबर यांचे नाव घेतले. माझ्यासारखा अनुभव अनेक महिलांना आला असेल कदाचित त्या सुद्धा पुढे येतील असे रमानी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: M j akbar resigned as minister of state for external affairs following metoo allegations
First published on: 17-10-2018 at 16:50 IST