मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे लग्नमांडवातून सहा वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. बलात्कारानंतर नराधमाने मुलीची हत्या केली असून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी नराधमाने तिचा चेहरा दगडाने ठेचला होता. मात्र, नराधम सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्वाल्हेरमधील एका गावात बुधवारी रात्री लग्न समारंभ होता. पीडित मुलगी तिच्या आई- वडिलांसोबत तिथे गेली होती. यादरम्यान नराधमाने तिला गाठले. आईसक्रीम देण्याच्या बहाण्याने नराधमाने चिमुकलीला लग्नमांडवाच्या बाहेर नेले. यानंतर तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर नराधमाने तिची हत्या केली आणि ओळख पटू नये यासाठी तिचा चेहरा दगडाने ठेचला. यानंतर तो पुन्हा लग्नमांडवात परतला.

दुसरीकडे बराच वेळ झाला तरी मुलगी दिसत नसल्याने आई- वडिलांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेवटी या प्रकरणी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली. गुरुवारी सकाळी लग्न समारंभ सुरु असलेल्या कार्यालयापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या जंगलात मुलीचा मृतदेह सापडला.

शवविच्छेदनात मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लग्नसमारंभ सुरु असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता यात एक नराधम पीडित मुलीला बाहेर घेऊन जाताना दिसला. या आधारे पोलिसांनी नराधमाची ओळख पटवली. रात्री एकच्या सुमारास तो मुलीला घेऊन बाहेर गेला होता. जवळपास दीड तासांनी तो एकटाच मांडवात परतला. नराधमाचे नाव जितेंद्र कुशवाह असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जितेंद्र कॅटरिंगसाठी लग्नसमारंभात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh 6 year old girl raped and murdered in gwalior body mutilated
First published on: 23-06-2018 at 00:11 IST