Madhya Pradesh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे १६ वर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमत्री होते. त्यानंतर आता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे कारण आत्तापर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार मध्य प्रदेशात भाजपाने १५० जागांवर आघाडी घेतली आहे. या आकडेवारीत फारसा बदल होणार नाही. मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. शिवराज सिंह चौहान यांनी ही किमया कशी साधली? आपण जाणून घेऊ.
फोडाफोडीनंतर काय चर्चा होती?
मध्य प्रदेशात फोडाफोडी झाल्यानंतर कमलनाथ सरकार पाडण्यात आलं. त्यानंतर शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत अशा चर्चा होत्या. भाजपाची सत्ता येणार नाही त्यांना फटका बसेल असेही अंदाज वर्तवले जात होते. मात्र सगळे अंदाज फोल ठरवत भाजपाने सत्ता काबीज केल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
महिला मतांचा फायदा कसा झाला?
लाडली बहना या योजनेच्या अंतर्गत मध्य प्रदेशातल्या १ कोटी ३१ लाख महिलांना महिना १२५० रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे महिला वर्ग भाजपाकडे आपोआप वळला. मध्यप्रदेशात जेव्हा मतदान झालं तेव्हा महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. यातली बहुतांश मतं ही भाजपाच्या खात्यात गेल्याचं निकाल सांगत आहेत. त्यामुळे लाडली बहना ही योजना प्रभावी ठरली. लाडली बहना सारखीच लाडली लक्ष्मी ही योजनाही प्रभावी ठरली. लाडली लक्ष्मी योजना ही नुकत्याच जन्मलेल्या मुलींसाठी आहे. या दोन योजनांचा प्रभाव महिला मतदारांवर पडला आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला हे नाकारता येणार नाही.
अंगणवाडी सेविकांचं वेतन वाढलं
याशिवाय शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातल्या ३० लाख कनिष्ठ वर्गाच्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवलं. अंगणवाडी सेविकांचं वेतन महिना १० हजारांवरुन महिना १३ हजार रुपये केलं. याचाही सकारात्मक परिणाम झाला.
मध्य प्रदेशात १६ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज सिंह चौहान यांना पक्षातून कुठलंही आव्हान देण्यात आलं नाही. शिवराज सिंह चौहान यांना नरेंद्र तोमर, गणेश सिंह, कैलाश विजयवर्गीय, राकेश सिंह, प्रल्हाद सिंह पटेल, फग्ग सिंह कुलस्ते हे दिग्गज आव्हान देऊ शकत होते. या सगळ्यांना भाजपाने निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि आपली योग्यता आणि प्रभाव सिद्ध करण्यास सांगितलं. जर जबाबदारी हवी असेल तर स्वतःला सिद्ध करा हा मेसेजच दिल्लीने या सगळ्यांना दिला. त्यामुळे शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला पक्षातून विरोध झाला नाही. शिवराज सिंह चौहान यांचं नेतृत्व यामुळे अधोरेखित झालं.
हिंदुत्वाचा हुंकार
मध्यप्रदेशात हिंदुत्वाची मूळं खोलवर रुजलेली आहेत. त्यामुळेच काँग्रेसलाही सॉफ्ट हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागला. शिवराज सिंह चौहान यांनी राज्यातल्या मंदिरांचा चेहरामोहरा बदलून टाकला. तसंच अनेक मंदिरांच्या जिर्णोद्धाराचं आणि त्यांना नवं रुप देण्याचं काम सुरु आहे. देवीलो, रामलोक, चित्रकूट इथल्या मंदिरांच्या विकासासाठी मध्यप्रदेश सरकारने ३५८ कोटींचं बजेट दिलं आहे. याशिवाय बुलडोझर ब्रांडच्या राजकारणाचा प्रयोगही शिवराज सिंह चौहान यांनी केला. उज्जैनमध्ये शोभायात्रेवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालले. तसंच उज्जैनमध्ये एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या घरावरही बुलडोझर चालला. या निर्णयांचा फायदाही मध्य प्रदेशमध्ये भाजपाला झाला आहे. मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता येणार हे निश्चित झालं आहे आणि शिवराज सिंह चौहान हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील यात शंका नाही.