MP Police Ramcharitmanas: मध्य प्रदेश पोलीस खात्याकडून पोलीस विभागात नव्याने भरती होणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलिसांसाठी नवा उपक्रम प्रस्तावित केला आहे. सर्व प्रशिक्षणार्थी पोलिसांनी दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन तास रामचरितमानसचं पठण करण्याचा हा प्रस्ताव असून त्यासाठी दररोज पोलीस विभागाकडून विशेष सेशन देखील घेण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामाच्या १४ वर्षांच्या वनवासातून प्रशिक्षणार्थी पोलिसांना काही शिकायला मिळेल, या उद्देशाने हा उपक्रम राबवणार असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

मध्य प्रदेशमध्ये नव्याने निवड झालेल्या जवळपास ४ हजार पोलिस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण या आठवड्यात सुरू होणार आहे. मात्र, हे प्रशिक्षण सुरू होण्याआधीच त्यातल्या अनेक प्रशिक्षणार्थींनी आपलं प्रशिक्षण घराजवळच्या एखाद्या केंद्रावर व्हावं, अशी विनंती करणारी पत्रे पोलीस विभागाला पाठवली आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य प्रदेश पोलिसांच्या प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजा बाबू सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

“…मग अवघड पोस्टिंगला हे पोलीस कसं काम करणार?”

“मला नव्याने भरती झालेल्या प्रशिक्षणार्थींकडून विनंती अर्ज येत आहेत. यात त्यांचं प्रशिक्षण त्यांच्या घराजवळच्या एखाद्या केंद्रावर केलं जावं, अशी मागणी केली जात आहे. पण त्यांची ही मानसिकता पोलीस दलासाठी उपयोगी नाही. जर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या घराजवळच प्रशिक्षण दिलं, तर मग एखाद्या कठीण पोस्टिंगच्या ठिकाणी ते परिस्थितीशी कसे जुळवून घेणार?” असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला आहे.

प्रभू श्रीरामाच्या वनवासाचा धडा!

दरम्यान, प्रशिक्षणार्थींना याच मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी रामचरितमानसच्या पठणाचा उपक्रम सुरू करणार असल्याचं सिंह म्हणाले. “प्रभू श्रीराम १४ वर्षं त्यांच्या घरी परतले नव्हते. या काळात ते जंगलात आयुष्य कसं जगायचं हे शिकले, लष्कर तयार केलं आणि कठीण परिस्थितीवर मात केली. जर आपल्याला आपल्या प्रशिक्षणार्थींना अशा प्रकारचे धडे द्यायचे असतील, तर त्यासाठीची उदाहरणं आपल्या स्थानिक संस्कृतीतूनच यायला हवी”, असं ते म्हणाले.

मध्य प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४००० पैकी ३०० पोलिसांनी घराजवळच्या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण व्हावं, अशी विनंती केली आहे. जर यातल्या काहींना जरी परवानगी दिली, तरी अशा मागण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. जवळपास ९ महिने हे प्रशिक्षण दिलं जाणार असून दररोज रामचरितमानसच्या पठणासाठी विशेष सेशन घेतलं जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजाबाबू सिंह यांचे उपक्रम

याआधीही राजाबाबू सिंह यांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबवले होते. ग्वाल्हेरचे एडीजी म्हणून काम पाहात असताना राजाबाबू सिंह यांनी सुरू केलेला ‘गीता ग्यान’ उपक्रम विशेष चर्चेत आला होता. यावेळी भगवद्गीतेबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी तुरुंगातील कैद्यांना भगवद्गीतेच्या प्रती वाटल्या होत्या. याशिवाय, प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर स्थानिक मार्शल आर्ट व नृत्याच्या कलांचीही माहिती प्रशिक्षणार्थींना देण्याचा नियम त्यांनी बनवला.