मध्य प्रदेशातील अर्चना तिवारी ही २९ वर्षीय महिला नर्मदा एक्स्प्रेसने निघाली होती. तिचा कोच नंबर बी ३ आणि सीट नंबर ३ होता. तिने या गाडीने प्रवासही सुरु केला. पण ही एक्सप्रेस ६ ऑगस्टला जेव्हा कटनी या स्टेशनला पोहचली तेव्हा तिच्या बर्थवर फक्त तिची बॅग होती. बॅगेसह राखी, एक रुमाल आणि लहान मुलांसाठी भेटवस्तू घेतलेल्या होत्या. यानंतर सुरु झाला तो अर्चनाचा शोध. मागील काही दिवसांपासून अर्चना तिवारी ही महिला बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं विविध राज्यांत रवाना झाली आहेत.

पोलिसांकडून अर्चना तिवारीचा शोध घेतला जातो आहे

१२ तासांच्या प्रवासाला निघाली होती अर्चना तिवारी पण ती सापडलीच नाही. मात्र आता तिचा शोध पोलिसांकडून विविध राज्यांमध्ये घेतला जातो आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. अर्चना तिवारीला बेपत्ता होऊन साधारण दोन आठवडे झाले आहेत. तिच्या कुटुंबाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अर्चना तिवारी इंदूरच्या उच्च न्यायालयात वकील

अर्चना तिवारी मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी असलेल्या उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहे. न्यायाधीश होण्यासाठीच्या परीक्षेसाठीही ती तयारी करते आहे. अर्चनाचा भाऊ अभिषेक म्हणाला, “तिला न्यायाधीश व्हायचं असल्याने ती परीक्षेची तयारी करत होती. तसंच राखी पौर्णिमेला ती घरी येईल म्हणून आम्ही तिची वाट बघत होतो. पण ती अचानक बेपत्ता झाली.” ५ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी अर्चना तिवारी बाहेर पडली. ती इंदूरमध्ये राहात होती. हॉस्टेलमधून तिने तिची बॅग पॅक केली आणि तिने नर्मदा एक्स्प्रेसने प्रवास सुरु केला. रात्री १०.१५ ला अर्चनाने तिच्या मावशीला फोन केला होता. अर्चनाने सांगितलं की भोपाळच्या जवळ पोहचले आहे आपण लवकरच भेटू. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्चनाला घ्यायला जाण्यासाठी तिच्या कुटुंबाचे सदस्य प्लॅटफॉर्मवर उभे होते. पण अर्चना पोहचलीच नाही. तिच्या मोबाइलचं लोकेशन नर्मदा रेल्वे पुलाजवळ सापडलं होतं. हे ठिकाण नर्मदापुरम जिल्ह्यात आहे.आता पोलिसांनी कुटुंबाने तक्रार केल्यानंतर तिचा शोध सुरु कऱण्यात आला आहे.

पोलिसांकडून अर्चनाचा शोध सुरु

मागील दोन आठवड्यांपासून अर्चना तिवारीचा शोध सुरु आहे. जीआरपी अधीक्षक राहुल कुमार म्हणाले की अर्चनाचं शेवटचं लोकेशन आम्हाला इटारसी या ठिकाणी दाखवतं आहे. काही प्रवाशांनी तिला पाहिल्याचं आम्हाला सांगितलं आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत असंही राहुल कुमार यांनी स्पष्ट केलं.