अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण आता थेट मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई खंडपीठानं मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तिरुचेंदुरच्या सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर प्रशासनाकडून यासंदर्भात याचिका सादर करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपूर्ण तामिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश तामिळनाडू सरकारला दिले. यावेळी मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश दिल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचिका एका मंदिरासाठी, आदेश पूर्ण राज्यासाठी!

वास्तविक सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर प्रशासनाने त्या मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, आदेश देताना न्यायालयाने संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरात पावित्र्य आणि शुद्धता राखली जावी, यासाठी मोबाईल फोनवर बंदी असावी, असं या आदेशांत नमूद केल्याचं वृ्त्त’लाईव्ह लॉ’नं दिलं आहे.

काय होती याचिकाकर्त्यांचा दावा?

गेल्या महिन्यात ही याचिका दाखल करण्यात आली होती. ‘सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये ‘आगम’ नियमावली महत्त्वाची भूमिका पार पाडते. यानुसार मोबाईल फोन किंवा कॅमेरे किंवा फोटोग्राफी याला मनाई करण्यात आली आहे. पण हल्ली मोबाईल फोनवरही फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात. मूर्ती आणि पूजाविधींचे फोटो काढले जातात. त्यामुळे इतर भक्तांनाही त्याचा त्रास होतो’, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, मोबाईल फोन आणि कॅमेऱ्याचा वापर निषिद्ध असल्याचं बजावणारे नोटीस बोर्ड मंदिरात ठिकठिकाणी लावण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाला देण्यात आली. तसेच, मंदिरात येणाऱ्या भक्तांनी योग्य पद्धतीने पेहेराव करणं आवश्यक आहे, अशीही मागणी मंदिर प्रशासनाकडून न्यायालयाकडे करण्यात आली.

विश्लेषण: नागरिकत्व सुधारणा कायद्यात तामिळी निर्वासितांचा मुद्दा का आला? द्रमुकचा कायद्याला तीव्र विरोध का?

यावर निकाल देताना न्यायालयाने फक्त सुब्रह्मण्यमस्वामी मंदिरातच नाही, तर राज्यातल्या सर्वच मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. तसेच, भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिराच्या बाहेरच मोबाईल फोन ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madras high court orders mobile ban in tamilnadu temples for purity and sanctity pmw
First published on: 03-12-2022 at 17:43 IST