सरताज अझिझ यांचा आरोप

अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा आणि आदिवासी क्षेत्रातील विशेषत: उत्तर वझिरिस्तानातील मदरसे दहशतवादी कारवायांचे मुख्य केंद्र बनले आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने ९/११ नंतर तालिबान्यांना सत्तेवरून खाली उतरण्यास भाग पाडल्यानंतर जे निर्वासित देशात आले त्यांच्यावर अझिझ यांनी या प्रकारचे खापर फोडले आहे.

या मदरशांमध्ये दहशतवादी कारवायांच्या सुनियोजित पायाभूत सुविधा आहेत, बॉम्ब तयार करण्याचे कारखाने आहेत, दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे आहेत, आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण देणारी केंद्रे आहेत आणि हे सर्व प्रशिक्षण मशिदीखालील बहुमजली तळघरात दिले जाते, असेही अझिझ यांनी संरक्षण विषयावर लेखन करणाऱ्या एका गटाला सांगितले.

यापैकी एका मशिदीला म्हणजेच मिनारशहा मशिदीला आपण भेट दिली. बाहेरून आपल्याला कोणतीही जाणीव होत नाही, मात्र मशिदीच्या खाली ७० खोल्यांचे तळघर आहे, तीन मजल्यांवर चार ते पाच बॉम्ब तयार करण्याचे कारखाने आहेत, चार ते पाच आत्मघातकी प्रशिक्षण केंद्रे आहेत, संपर्कप्रणालीची व्यवस्था आहे, व्हीआयपी कक्षही आहे, कॉन्फरन्स कक्ष असे चक्रावून टाकणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत, असे अझिझ म्हणाले.

उत्तर वझिरिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराने झर्ब-ए-अब्झ ही कारवाई हाती घेतली तेथे अशा प्रकारच्या सुविधा असलेल्या ३ ते ४० मशिदी आहेत, असे अझिझ म्हणाले आणि पाकिस्तानात दहशतवादी पायाभूत सुविधा किती खोलवर पोहोचल्या आहेत ते सूचित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील आदिवासी क्षेत्रात अशा प्रकारची सात केंद्रे असून उत्तर वझिरिस्तान त्यापैकी एक आहे. पाकिस्तानने याविरुद्ध कारवाई केली नसती तर आता तेथे पुढील २० वर्षे दहशतवादी हल्ले करता येतील इतक्या प्रमाणात बॉम्ब आणि अन्य स्फोटक घटक होते, मात्र आता ते नष्ट करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. आदिवासी क्षेत्रातील अफगाणिस्तानच्या निर्वासितांमुळेच पाकिस्तान दहशतवादी कारवायांचे केंद्र बनला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.