अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणि २५ टक्के आणि त्यानंतर आणखी २५ टक्के असं एकूण ५० टक्के टॅरिफ लावणाचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. टॅरिफच्या मुद्द्यामध्ये काहीतरी सुवर्णमध्य निघेल अशी अपेक्षा भारताला होती. मात्र, आता परत एकदा अमेरिकेने चीनचा उल्लेख करत भारताला पुन्हा इशारा दिला आहे. तसंच काही गंभीर आरोपही केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला भारतच कारणीभूत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच हे युद्ध जास्त काळ सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारविषयक सल्लागार पीटर नवारो यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, शांततेचा मार्ग भारताहून जातो. मी भारतावर खूप प्रेम करतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत. मात्र, भारताला हे समजले पाहिजे की, त्यांच्यामुळे काय होतं आहे.

आणखी काय म्हणाले पीटर नवारो?

भारताला रशियाकडून तेल खरेदीची आवश्यकता आहे या दाव्याला काहीही अर्थ नाही हा बिनबुडाचा दावा आहे. हा सगळा नफेखोरीचा खेळ आहे. टॅरिफ लागू होण्यासाठी सहा दिवस उरले आहेत. मात्र भारताला हा सगळा घटनाक्रम बहुदा मान्य नाही. आता भारत चीनसह जवळीक वाढवतो आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प दुप्पट टॅरिफमध्ये भारताला काही सूट देण्याच्या किंवा मुदतवाढ देण्याच्या तयारीत नाहीत. असं पीटर नवारो यांनी म्हटलं आहे. नवारो म्हणाले, भारत टॅरिफचा महाराजा आहे. आम्ही भारतासह व्यापार करुन नुकसान सहन करतो आहे. भारत आमच्याशी व्यापार करुन जे पैसे कमावतो त्यातून रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतो, त्यामुळे भारताला मोठा नफा मिळतो असाही आरोप नवारो यांनी केला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेबाबत वक्तव्य केलेलं असतानाच नवारो यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

एस. जयशंकर काय म्हणाले होते?

मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, “रशियन तेलाचे सर्वात मोठे ग्राहक आम्ही नसून, चीन आहे. याचबरोबर रशियन एलएनजीचे सर्वात मोठे खरेदीदारही आम्ही नाही, मला खात्री नाही, पण मला वाटते की ते युरोपियन युनियन आहे. २०२२ नंतर रशियासोबत सर्वात जास्त व्यापार वाढवणारा देश आम्ही नसून, ते दक्षिणेकडे काही देश आहेत. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन लोक म्हणत आहेत की, आपण जगातील तेल बाजारपेठा स्थिर करण्यासाठी सर्वकाही केले पाहिजे, ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करण्याचाही समावेश आहे. आम्ही अमेरिकेकडूनही तेल खरेदी करतो आणि ते प्रमाण वाढत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, या युक्तिवादाच्या तर्काबद्दल आपण खूप गोंधळलो आहोत”, असेही जयशंकर म्हणाले.