नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे पुढील महिन्यात होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजप अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी केली. ही निवड बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षांशी चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त आहे. घटनेनुसार हे पद लवकरात लवकर भरणे आवश्यक असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ९ सप्टेंबर रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार या निवडणुकीत मतदान करतील. सध्याचे संख्याबळ पाहता सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असल्याने त्यांच्याकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नड्डा यांना रालोआने उमेदवार निवडीचे सर्वाधिकार दिले होते. भाजपच्या संसदीय पक्षाने रविवारी मान्यता दिल्यानंतर राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा नड्डा यांनी केली. राधाकृष्णन हे कसलेले राजकारणी असून तमिळनाडूतील समाजाच्या प्रत्येक वर्गात त्यांना मान असल्याचे नड्डा यावेळी म्हणाले. तसेच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विरोधकांशी चर्चा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २२ ऑगस्ट आहे. विरोधी पक्षांनी आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही.

तमिळनाडूच्या राजकारणावर परिणाम?

* राधाकृष्णन हे मूळचे तमिळनाडूचे आहेत. कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले होते. तमिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत.

* अनेकदा प्रयत्न करूनही तेथे भाजपला पाय रोवता आलेले नाहीत. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी संधी दिल्याचा मुद्दा भाजपकडून प्रचारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

* द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने या मुद्द्यावर प्रचार केला होता. तमिळनाडूमध्येही हाच प्रयोग होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.

अल्पपरिचय

– चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील तिरुपूर येथे झाला.

– मे २००३ ते सप्टेंबर २००६ या काळात ते भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष होते.

– १९९८ ते २००४ अशी सात वर्षे राधाकृष्णन यांनी लोकसभेमध्ये कोइंबतूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

– १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ या काळात ते झारखंडचे राज्यपाल होते.

– ३१ जुलै २०२४ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारला. – २० मार्च २०२४ ते ३० जुलै २०२४ या काळात तेलंगणचे प्रभारी राज्यपाल आणि २२ मार्च २०२४ ते ६ ऑगस्ट २०२४ असे सुमारे साडेचार महिने ते पुद्दुचेरीचे प्रभारी नायब राज्यपाल होते.