लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील स्वच्छ शहरांच्या विशेष ‘सुपरलीग’ श्रेणीत इंदूरने बाजी मारली असली तरी, १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशात यंदा अहमदाबादने ‘सर्वात स्वच्छ शहर’ असा मान पटकावला. महाराष्ट्राने स्वच्छता सर्वेक्षणात १० राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देशात दबदबा कायम राखला. तीन ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र सर्वाधिक स्वच्छ गणले गेले.
केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशभर स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. २०२४-२५ च्या सर्वेक्षणातील मानांकित शहरांचा गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यंदा ‘सुपर स्वच्छ लीग’ या नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला, त्याचबरोबर स्वच्छ शहरांची श्रेणीही कायम ठेवण्यात आली. नव्या श्रेणीमुळे इंदूर शहराला सर्वात स्वच्छ शहराचा मान ‘सुपर स्वच्छ लीग’ या श्रेणीतून देण्यात आला व देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये हा मान अहमदाबादला मिळाला.
देशातील स्वच्छ शहरांच्या श्रेणीत ३ ते १० लाखांच्या लोकसंख्येच्या शहरांमध्ये मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राने सर्वाधिक स्वच्छ शहराचा मान पटकावला. ५० हजार ते ३ लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले. उदयोन्मुख स्वच्छ शहरांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला.