Major Vinay Narwal Wife: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा चेहरा मॉर्फ करून अश्लील एआय व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी हरियाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींना बिहारमधील गोपाळगंज येथून अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अटक केलेल्यांची ओळख मोहिबुल हक आणि गुलाब जालान अशी आहेत. गुलाब जालान हा मोहिबुल हकचा मुलगा आहे. दोघेही बऱ्याच काळापासून ‘रियल पॉइंट’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवत आहेत. त्यांच्या चॅनलवर असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून लोकांना फसवले जात आहे आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले जात आहेत.
दरम्यान पोलिसांना संशय आहे की, हे एक मोठे नेटवर्क असून, त्यात फक्त या बाप-लेकांव्यतिरिक्त इतर अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे डिजिटल फॉरेन्सिक तपासणीद्वारे या आरोपींचे संपूर्ण नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
गुरुग्राम पोलिसांच्या या कारवाईला गोपाळगंज पोलिसांनी दुजोरा दिला आहे. याचबरोबर बिहार पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरही याबाबत माहिती दिली आहे. आज तकशी बोलताना गोपाळगंजचे पोलीस अधिक्षक अवधेश दीक्षित म्हणाले की, तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने यूट्यूब चॅनेल ट्रॅक करण्यात आले आणि त्यानंतर आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
यापूर्वीही असे अनेक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, पोलीस प्रत्येक वेळी आरोपींवर कारवाई करतात, परंतु नवनव्या तंत्रज्ञानामुळे या आरोपींना पकडणे एक आव्हान बनत आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले होते. ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून बहावलपूर आणि मुरीदके येथील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
हरियाणातील करनाल येथील मेजर विनय नरवाल (२६) यांचे १६ एप्रिल २०२५ रोजी लग्न झाले होते. त्यानंतर ते पहलगामला हनिमूनसाठी गेले होते. तेव्हा २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले होते.