पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा करून या दौऱ्यातील काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले होते. यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी त्यावर वादग्रस्त टिप्पणी केली. यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केली. भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. मालदीव सरकारने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे आणि त्यांच्या मंत्र्याने केलेल्या या वक्तव्याशी सरकारचा संबंध नाही, असं म्हटलं आहे.

झाहिद रमीझ यांच्यापाठोपाठ मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या मंत्री मरियम शिउना यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मरियम शिउना यांनी मोदी यांना ‘विदूषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ म्हटलं होतं. मरियम शिउना यांना मालदीव सरकारने निलंबित केलं आहे. यांच्यासह मालशा शरीफ आणि महजून माजिद यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन मंत्र्यांनीदेखील नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती.

मालदीव सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री इब्राहिम खलील यांनी काही वेळापूर्वी आज तकशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, यावर मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सोलिह म्हणाले, मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी समाजमाध्यमांवर भारताविरोधात वापरलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो.

मालदीवमधील मोहम्मद मुइज्जू यांच्या सरकारमधील मंत्री मरियम शिउना यांच्यासह काही मंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. भारत सरकारने हा मुद्दा मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला. मालदीवमधील भारताच्या उच्चायुक्तांनीदेखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मालदीव सरकारने अधिकृत निवेदन जारी केलं. मालदीव सरकारने म्हटलं आहे की, आमच्या मंत्र्यांनी केलेली व्यक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक आहेत. मालदीव सरकारचा त्याच्याशी संबंध नाही.

हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवचा तीळपापड; मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उभय देशांमधील संबंध तणावपूर्ण

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी मोहम्मद मुइज्जू निवडून आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये मीठाचा खडा पडला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. पदावर येताच त्यांनी भारताबरोबरची काही धोरणं बदलली. तसेच मालदीवमध्ये असलेले भारतीय लष्करी अधिकारी पुन्हा मायदेशी पाठवले. मोहम्मद मुइज्जू हे चीनधार्जिणे असल्याचा त्यांच्यावर अनेकदा आरोप झाला आहे.